३२ गावात भटकंती श्वानांनी ७५५ जणांना घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:10+5:302021-09-02T04:59:10+5:30
बल्लारपूर : पावसाळा आला की मोकाट कुत्रे, विंचू व साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जमिनीत पाणी साचल्यामुळे ...
बल्लारपूर : पावसाळा आला की मोकाट कुत्रे, विंचू व साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जमिनीत पाणी साचल्यामुळे साप व विंचू बाहेर येतात, तर कुत्र्यांचा कळप सर्वत्र दिसतो. मागील पाच वर्षांत बल्लारपूर तालुक्यात ३२ खेडेगावांची लोकसंख्या ४६ हजार १४५ आहे. या पाच वर्षांत ३२ गावातील ७५५ जणांना भटकंती श्वानांनी चावा घेतला आहे. ४२ जणांना विंचू चावला. तर १९ जणांवर सापाने दंश केल्याची नोंद कळमना, कोठारी व विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे.
तालुक्यातील कळमना आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या कळमना, जोगापूर, कोर्टी मक्ता, जुनी दहेली, नवी दहेली, बामणी, अमितनगर, केम तुकूम, केम रिठ, आसेगाव, गिलबिली, मोहाडी तुकूम या १२ गावांची लोकसंख्या १३ हजार १० आहे. गावांमध्ये पाच वर्षांत भटकंती श्वानांनी १७९ जणांचा चावा घेतला तर ४० जणांना विंचू चावला. मात्र साप चावल्याची नोंद नाही. विसापूर आरोग्य केंद्रांतर्गत विसापूर, भिवकुंड, चुनाभट्टी, नांदगाव, शिवणी, आरवट, चारवट, हडस्ती, हिंगनाळा या नऊ गावांची लोकसंख्या १६ हजार ३३ आहे. गावात घरगुतीपेक्षा भटकंती श्वानांची संख्या जास्त आहे. या श्वानांनी ४६४ जणांचे लचके तोडले. संख्या तालुक्यातील गावातून सर्वाधिक आहे. याशिवाय ९ जणांना सापाने दंश केला तर २५ जणांना विंचू चावला.
कोठारी आरोग्य केंद्र अंतर्गत कोठारी, काटवली, बामणी, पळसगाव, आमडी, एनबोडी, किन्ही, कोर्टी तुकूम, भडकाम, मानोरा, इटोली, कवडजई ही ११ गावे येतात. या गावांची लोकसंख्या १७ हजार १४२ आहे. या गावात पाच वर्षांत ११२ जणांना श्वानांनी चावा घेतला. १० जणांना सर्पदंश झाला. १७ जणांना विंचू चावल्याची नोंद आहे.
तालुक्यात अनेक प्रकारचे साप आढळतात. प्रत्येक साप विषारी असतोच असे नाही, तर काही बिनविषारीसुद्धा आहेत. ग्रामीण भागात शिवारात पावसाळ्यात साप बाहेर येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अशा वेळेस घाबरून न जाता त्याची माहिती सर्पमित्राला व जवळच्या रुग्णालयाला देणे गरजेचे आहे.
- देवा करमरकर, सर्पमित्र, बल्लारपूर.
पावसाळ्याच्या दिवसात भटकंती श्वान असो वा साप व विंचू यावर सर्व प्रकारचे उपचार आहेत परंतु न घाबरता लगेच उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात यावे.
- अशोक तुरारे, तालुका आरोग्य सहायक, बल्लारपूर
पाच वर्षांत श्वानांनी घेतला चावा
विसापूर कोठारी कळमना
२०१७ - ९५ २२ २६
२०१८ - ९४ १६ ३८
२०१९ - ७६ ०६ ५३
२०२० - १०२ ४३ २३
२०२१ - ९७ २५ ३९
010921\kutre.. - copy.jpg
कुत्र्याचा फोटो