३२८ प्रगणक व २२ पर्यवेक्षक करणार सर्वेक्षण, मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात
By परिमल डोहणे | Published: January 23, 2024 03:12 PM2024-01-23T15:12:31+5:302024-01-23T15:14:15+5:30
प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.
सावली (चंद्रपूर ) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुला प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाकरिता तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक व इतर कर्मचारी मिळून एकूण ३२८ प्रगणक आणि २२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.
मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यासंदर्भात तालुकास्तरावर सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनात दि. २१ व २२ जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. या सर्वेक्षणात तालुक्यातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबासाठी प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे.
सर्वेक्षण करण्याकरिता प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. ते प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे, माहिती देताना मनात कुठलीही शंका निर्माण करू नये, कुटुंबाची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
परिक्षित पाटील,
तहसीलदार तथा तालुका नोडल अधिकारी सावली.