वन्यप्राणी गणना: ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबट व २५ अस्वल

By राजेश भोजेकर | Published: May 7, 2023 12:45 PM2023-05-07T12:45:40+5:302023-05-07T12:45:51+5:30

वन्यप्राणी गणना : पावसामुळे पाणवठ्यावर वाघ, बिबट फिरकलेच नाही

33 tigers, 16 leopards and 25 bears were found in Tadoba | वन्यप्राणी गणना: ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबट व २५ अस्वल

वन्यप्राणी गणना: ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबट व २५ अस्वल

googlenewsNext

चंद्रपूर : बुध्द पौर्णिमेच्या रात्री शुक्रवारी (दि. ५) ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअरझोन मध्ये ७१ मचणींवरून झालेल्या वन्यप्राणी गणनेमध्ये ३३ वाघ, १६ बिबट तर २५ अस्वल आढळून आले आहे. तसेच २३६० तृणभक्ष्यी व अन्य वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली असून, ही संख्या समाधानकारक आहे. मात्र वाघ व बिबट्यांची नोंदीत घट दिसून आली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला ताडोबात सर्वात जास्त पाऊस झाल्यामुळे जंगलातील नाले व अन्य ठिकाणी पाणी भरल्याने पाणवठ्यांकडे वाघ, बिबटे फिरकले नाहीत. त्यामुळेच वाघ व बिबट्यांच्या गणनेमध्ये कमालीची घट आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा प्रकल्प देशभरात व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिध्द असे ठिकाण आहे. या ठिकाणी बफर आणि कोअर असे दोन झोन आहेत. दरवर्षी बुध्द पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी वन्यप्राणी गणनेचा निसर्गानुभव कार्यक्रम पार पडतो. शुक्रवारी बुध्द पौर्णिमेच्या रात्री बफर झोनमध्ये निसर्गप्रेमी, अशासकीय संस्था यांचे माध्यमातून वन्यप्राणी गणना करण्यात आली. तर कोअर झोनमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी गणना केली. ताडोबातील पाणवटे, रस्त्याच्या कडेला व अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७१ मचानी वरून ही गणना सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात आली. वन्यप्राणी गणनेत बफर व कोअर झोनमध्ये ३३ वाघ, १६ बिबटे आणि २५ अस्वलाची नोंद घेण्यात आली आहे. तर 26360 तृणभक्ष्यी व अन्यप्रायांची नोंद करण्यात आली आहे.

कोअर झोनमध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेमध्ये १९ वाघ, ४ बिबटे व २० अस्वल आढळून आले. बफर झोनमध्ये निर्सगप्रेमी व अशासकीय संस्थांनी केलेल्या गणनेमध्ये १४ वाघ, १२ बिबटे व ५ अस्वल आढळून आले. तृणभक्ष्यी व अन्य प्राण्यांमध्ये कोअर झोन मध्ये रानगवा ८७, चितळ ८७२, सांभर १६४, निलगाय ७, रानकुत्रे ४५, तर २३८ रानडुकरांची नोंद करण्यात आली आहे. बफर झोनमध्ये रानगवा ११५, चितळ ४२१, सांभर १३५, निलगाय ३९, रानडुकरे २३७ तर रानकुत्र्यांची संख्या शून्य आहे.

वाघ व बिबट्यांच्या नोंदीवर बदललेल्या वातावरणाचा परिणाम

कोअरमध्ये १४१३ तर बफरझोनमध्ये ९४७ वन्यप्राणी आढळून आले. वाघ, बिबट व अस्वलाची संख्या घेतली तर कोअर झोनमध्ये १४५६ तर बफरमध्ये ९७८ वन्यप्राण्यांची एकूण नोंद करण्यात आली. निलगायी ह्या झुडपी व विरळ जंगलात किंवा गावाशेजारी राहतात. त्यामुळे कोअरझोनमध्ये निलगायींची संख्या फक्त ७ आहे. तृणभक्ष्यीसह अन्य वन्यप्राण्यांच्या नोंदी ह्या समाधानकारक आहेत; परंतु वाघ व बिबट्यांच्या नोंदीवर बदललेल्या वातावरणाचा परिणाम आढळून आला आहे.

विदर्भात मार्चच्या मध्यान्हांपासून तर एप्रिल मध्ये अवकाळी पाऊस कोळसला. त्यांनतर मे च्या प्राणी गणनेच्या दोन दिवसापर्यंत वर्षातील १० टक्के पाऊस चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बरसला. प्राणी गणनेच्या कालावधीपर्यंत ओसाड असणारे जंगले यावेळी अवकाळी पावसाने बहरून आली. शिवाय ताडोबातील नाले, खड्डे व अन्य पाण्याचे ठिकाणे भरलीत. ऐरवी पानवठ्यांशिवाय वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी दुसरे ठिकाण मिळत नव्हते. परंतु जंगलात ठिकठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी मिळू लागल्याने वन्यप्राण्यांची तहाणी पाणवठयांशिवाय भागत आहे. याच कारणांमुळे बुध्द पौर्णिमेच्या रात्री पाणी पिण्यासाठी वन्यप्राणी फारसे पानवठ्यांवर, रस्त्यांवर फिरकले नाहीत. त्यामुळे वातावरणाच्या बदलाचा वन्यप्राणी गणनेवर परिणाम पडून वाघ, बिबट नोंदीत घट आढळून आल्याचे ताडोबा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

Web Title: 33 tigers, 16 leopards and 25 bears were found in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.