३४ गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2017 01:02 AM2017-05-02T01:02:17+5:302017-05-02T01:02:17+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांचा कामगार दिनी गौरव करण्यात आला.
चंद्रपूर परिमंडळ : महावितरणमधील उल्लेखनीय कामाची दखल
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांचा कामगार दिनी गौरव करण्यात आला. १ मे रोजीचे औचित्य साधून चंद्रपूर परिमंडळाच्या कार्यालयात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी हा कार्यक्रम झाला.
महावितरणचे कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत काम करीत असतात. उल्लेखनीय कार्य करून महावितरणची मान उंचावण्याचा प्रयत्न करीत असतात. या गुणवंत कर्मचाऱ्यांच्या सेवेची दखल घेत चंद्रपूर परिमंडळातील ३४ कर्मचाऱ्यांचा ‘गुणवंत कामगार’ म्हणून परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या हस्ते पुरस्कार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आला. त्या गुणवंत कर्मचाऱ्यांत चंद्रपूर मंडळातील १७ व गडचिरोली मंडळातील १७ कर्मचाऱ्याचां समावेश आहे.
भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे या थोर कामगार नेत्याच्या प्रतिमेस मुख्य अभियंता घुगल यांच्या समवेत गुणवंत कर्मचाऱ्यांनी माल्यार्पण केले. यावेळी नारायण मेघाजी लोखंडे यांना अधीक्षक अभियंता (चंद्रपूर परिमंडळ )हरीश गजबे , अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल घोघरे व सर्व उपस्थितांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता ए. डी. सहारे, कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार, प्रणाली विश्लेषक पंकज साटोने आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनी भविष्यातही आपापल्या कार्यक्षेत्रात काम करताना ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. तसेच काम करताना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचेही आवाहनही त्यांनी केले. सत्कार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी पार पाडलेल्या उत्कृष्ट कामासाठी प्रोत्साहन देत त्यांच्या कामाचे अनुसरण करून जास्तीत जास्त गुणवंत कर्मचारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांतून निर्माण व्हावे, अशी आशा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सुनील पिसे यांनी केले. तर सहायक मुख्य व्यवस्थापक (मा.सं.) महेश बुरंगे यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)