३४ हजार नागरिक; डॉक्टर एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:01 PM2018-10-17T22:01:13+5:302018-10-17T22:01:56+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. मात्र या केंद्रात आरोग्य सेवा कोलमडली आहे. अनेक पदे रिक्त असून ३२ गावांसाठी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहेत.
खडसंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येते. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त असून येथील इतर कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. सध्या परिसरात वातावरण बदलाने रुग्णांची संख्या वाढत आहे.
सर्दी, खोकला यासह विविध आजाराच्या रुग्णांची संख्या आरोग्य केंद्रात वाढत आहे. सोबतच शालेय तपासण्या, गरोदर मातांच्या तपासण्या व नसबंदी असे अनेक उपक्रम राबविताना या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
खडसंगी आरोग्य केंद्राच्या परिरासतील ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी एका डॉक्टरवर आरोग्य विभागाने लादली आहे. रिक्त पदांची भरती आरोग्य विभागाने करावी, अशी मागणी होत आहे.