बोगस बिटी बियाण्यांचे ३५० पाकिटे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:45 PM2019-03-08T22:45:16+5:302019-03-08T22:45:34+5:30
तालुक्यातील मराईपाटण येथील शेषराव कांबळे यांच्या घराजवळ असलेल्या गोडावूनवर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून बोगस बिटी बियाण्यांचे ३५० पाकिटे जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. टेकामांडवा पोलीस ठाण्यात मिलिंद शेषराव कांबळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास टेकामांडवा पोलीस करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्यातील मराईपाटण येथील शेषराव कांबळे यांच्या घराजवळ असलेल्या गोडावूनवर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून बोगस बिटी बियाण्यांचे ३५० पाकिटे जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. टेकामांडवा पोलीस ठाण्यात मिलिंद शेषराव कांबळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास टेकामांडवा पोलीस करीत आहे.
शासन मान्यता नसलेले अवैध बिटी बियाणे मराईपाटण येथील शेषराव संभाजी कांबळे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या गोडाऊनमध्ये साठवणूक करून ठेवल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. या माहितीवरून उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे तालुका कृषी अधिकारी आर. जी. दमाडे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी टी. जी. आडे, एम. जी. चव्हाण, कृषी सहाय्यक एम. एन. राठोड तसेच पोलीस शिपाई मंगेश गायकवाड, अमरदीप वावडे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सदर गोडावून धाड टाकली. यात बोगस बिटी बियाण्याचे ३५० पॉकिटे आढळून आली. या बियाण्यांची किंमत दोन लाख ९० हजार ५०० रूपये आहे. याप्रकरणी मिलिंद शेषराव कांबळे रा. मराईपाटण याला कृषी विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून टेकामांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.