बिबी शेतशिवारात वीज पडून ३६ शेळ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखाेंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 03:13 PM2023-04-25T15:13:13+5:302023-04-25T15:14:07+5:30
दुपारच्या नंतर अचानक वातावरणात बदल झाला
आवाळपूर (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील नांदा, बिबी, गडचांदूर परिसरात सोमवारी दुपारच्या नंतर अचानक वातावरणात बदल झाला. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच वेळी बिबी शिवारात शेळ्यांच्या कळपावर वीज पडली. यात ३६ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. यात १८ शेळ्या आणि १८ मेंढ्यांचा समावेश आहे. तर सहा ते आठ शेळ्या जखमी झाल्या.
गडचांदूर येथील जब्बार कुरेशी यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. ते बिबी येथील स्वप्निल टोंगे यांच्या शेतशिवाराच्या परिसरात आपल्या शेळ्या चारत होते. मात्र, अचानकपणे शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने ३६ शेळ्या जागीच ठार झाल्या व शिल्लकपैकी सहा ते आठ शेळ्या जखमी असून त्यासुद्धा जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असल्याचे दिसते. यात जब्बार कुरेशी यांचे जवळपास तीन लाखांच्या वर नुकसान झालेले असून घटनेची माहिती वनविभाग व महसूल विभागाला मिळताच पटवारी जाधव यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे.
लक्कडकोट येथे वीज पडून म्हैस ठार
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे सोमवारी दुपारी वीज पडून एक म्हैस जागीच ठार झाली. पुरुषोत्तम मलय्या जुपाका, रा. लक्कडकोट यांची ही म्हैस होती. ती गर्भवती होती. यात जुपाका यांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.