मनपा निवडणुकीसाठी ३६७ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 12:43 AM2017-04-10T00:43:57+5:302017-04-10T00:43:57+5:30

१९ एप्रिलला होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

367 polling stations for municipal elections | मनपा निवडणुकीसाठी ३६७ मतदान केंद्रे

मनपा निवडणुकीसाठी ३६७ मतदान केंद्रे

Next

भरारी पथके ठेवणार लक्ष : ३,०२०५७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
चंद्रपूर : १९ एप्रिलला होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था केली असून राज्याचे प्रधान सचिव यांनी या निवडणूक प्रक्रियेचा आढावाही घेतला आहे. मतदान प्रक्रियेसाठी शहरात ३६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात तब्बल २६ केंद्र संवेदनशिल असून पाच भरारी पथक सातत्याने या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.ए. साहरिया यांनी आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रपूर शहरात सध्या मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १९ एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर २१ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आज मनपाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर शहराची लोकसंख्या तीन लाख २० हजार ३७९ आहे. यातील मतदारांची संख्या तीन लाख २ हजार ५७ असून यात एक लाख ५४ हजार ७४७ पुरुष तर एक लाख ४७ हजार ३०१ महिला मतदार आहेत. १४१ इमारतींमध्ये या मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मतदारांसाठी सर्व सोईसुविधा असणार आहे. याशिवाय दिव्यांगाकरिता रॅम्पची विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३६७ केंद्रांसाठी ४४० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय पाच भरारी पथके, १२ चेक पोस्ट असणार आहेत. भरारी पथके सातत्याने पूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. १२ ठिकाणी नाकाबंदी करून २४ तास वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
निवडणुकीदरम्यान गैर प्रकाराचा अवलंब होणार नाही. तसेच कुठेही गोंधळ व संशयाची स्थिती निर्माण होणार नाही, यासाठी भरारी पथकासह पोलीस विभाग दक्ष राहणार आहे. भरारी पथके व्यवस्थितपणे काम करताहेत किंवा नाही याची वारंवार पाहणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी वनविभाग व आपातकालीन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. जिल्हयाच्या चहुबाजूस वनक्षेत्र आहे. या वनांचा आधार घेत निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये यासाठी वनविभाग आपले स्वतंत्र तपासणी नाके लावून तपासणी करणार आहेत, अशी माहितीही सहारिया यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत आदी उपस्थित होते.

आयुक्तांनी घेतल्या तीन बैठका
राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज रविवारी निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेताना लागोपाठ तीन बैठका घेतल्या. पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सहारिया यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान स्लिपचे १०० टक्के वाटप करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने दक्षता घेणे आवश्यक असलेल्या बाबी आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. निवडणूक प्रक्रिया अधिक चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. त्यानंतर तिसरी बैठक प्रसारमाध्यमांसोबत आयोजित करण्यात आली.

व्हीव्हीपॅटची
व्यवस्था नाही
इव्हीएम मशीनबाबत मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र या मशीनमध्ये घोळ होणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्पष्ट केले. काही जणांनी इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र एकाच मशीनमध्ये चार जणांना मतदान करायचे असल्याने व्हीव्हीपॅटची व्यवस्था यावेळी शक्य नसल्याचेही सहारिया यांनी सांगितले. ही व्यवस्था २०१९ पर्यंत अमलात येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

Web Title: 367 polling stations for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.