नागपूर विभागातील ३७ हजार पाणी नमुने अद्याप तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 07:00 AM2020-06-23T07:00:00+5:302020-06-23T07:00:01+5:30

यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

37,000 water samples from Nagpur division still unchecked | नागपूर विभागातील ३७ हजार पाणी नमुने अद्याप तपासणीविना

नागपूर विभागातील ३७ हजार पाणी नमुने अद्याप तपासणीविना

Next
ठळक मुद्देपावसाळ्यात उद्भवणार जलजन्य आजारांचा धोकालॉकडाऊनचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्क
राजेश मडावी
चंद्रपूर : आदिवासी व ग्रामीण भागात पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवू नये, याकरिता राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात विभागनिहाय पाण्याचे नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
राज्यातील पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात दरवर्षी एकून सार्वजनिक जलस्त्रोत, पाण्याचे नमुने आणि नमुने तपासणीचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. त्यासाठी राज्याचा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सर्व जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोग शाळांकडे जबाबदारी सोपविते. गतवर्षीच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सहा विभागात २ लाख १२ हजार ६१४ सार्वजनिक जलस्त्रोतांची नोंद करण्यात आली. यातील १ लाख ५० हजार १६ पाणी नमुन्यांची तपासणी शिल्लक आहे. नागपूर विभागात ७१ हजार ७३ जलस्त्रोत असून ३६ हजार ५६६ पाण्याचे नमुने मे २०२० पर्यंत तपासणीचे नियोजन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केले होते. त्यातील ३० हजार ४०० नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने ३७ हजार ७२ नमुन्यांची अद्याप तपासणीच होऊ शकली नाही. पाण्याचे नमुने तपासण्यात मागे पडलेल्या औरंगाबाद विभागानंतर नागपूर विभागाचा दुसरा क्रमांक आहे.

पाणी तपासणीचे कारण?
भूजलक्षेत्रात काम करणारे नियोजक, धोरण आखणाºया निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भूजल क्षेत्रात संशोधन व विकास साधणाºया यंत्रणांना पाण्याबाबत सर्वकष माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा भूजल विकासाशी निगडीत समस्यांना तोंड द्यावे लागते. पाण्याचे नमुने तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतस्तरावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अहवाल अत्यंत उपयुक्त ठरतो. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असताना ऐन पावसाळ्यात नागपूर विभागात यंदा नमुने तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही.

चंद्रपूरात मान्सूनपूर्व ११ हजार ५५१ नमुने संकलन
चंद्रपूर जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे अद्याप विश्लेषण झाले नाही. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती चंद्रपूर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाने दिली.

जलस्त्रोतांच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात विविध आजार होऊ नये, याकरिता सदर अहवालावरूनच विविध प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरित गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

Web Title: 37,000 water samples from Nagpur division still unchecked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी