३८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार संगणक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:36 AM2017-10-14T01:36:14+5:302017-10-14T01:36:26+5:30
जिल्ह्याने संगणक साक्षरतेकडे दमदार पाऊल टाकणे सुरु केले असून जिल्ह्यातील डिजिटल शाळांना आता टाटा ट्रस्टच्या मदतीने अद्यावत संगणक शिक्षणही मिळणार आहे....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याने संगणक साक्षरतेकडे दमदार पाऊल टाकणे सुरु केले असून जिल्ह्यातील डिजिटल शाळांना आता टाटा ट्रस्टच्या मदतीने अद्यावत संगणक शिक्षणही मिळणार आहे. जिल्ह्यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या ९४२ शाळांमध्ये ३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना पालकमंत्री संगणक प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात टाटा ट्रस्टसोबत केलेल्या करारानुसार बारामतीच्या प्रतिष्ठानतर्फे ही मोहीम जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभ्यासिका निर्माण करणे सुरु आहे. दुसरीकडे नव्या काळाची गरज लक्षात घेता, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारित असलेल्या सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी अद्यावत डिजिटल क्लास निर्माण करण्यात येत आहे. ‘प्रगतीचा जनक, माझा संगणक’ या घोष वाक्याखाली आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांना अद्यावत संगणक प्रशिक्षण मिळणार आहे.
जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची मोठी फळी यासाठी परिश्रम घेत असून या शिक्षकांचे प्रशिक्षण नियमित सुरु आहे. जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी शाळांपेक्षाही दर्जेदार व आधुनिक बनविण्याचा पालकमंत्री मुनगंटीवार यांचा संकल्प असून त्यातूनच ५ आॅक्टोंबरला जिल्हाभरातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या साक्षीने टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्युट आॅफ इम्फॉरमेशन टेक्नॉलाजी तर्फे तंत्रस्नेही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ५ आॅक्टोंबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते या बसला जनसेवेसाठी कार्यान्वित केले असून प्रत्यक्ष १ नोव्हेंबरपासून याचा लाभ मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांचा समावेश
प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे संगणक व प्रशिक्षक सामावून घेणाºया दहा अद्यावत बसेस जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या असून १ नोव्हेंबरपासून पहिल्या ६ तालुक्यात सदर प्रशिक्षण सुरु होणार आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील ८२ शाळा, बल्लारपूर, १६, जिवती ११, मूल २३, पोंभूर्णा १३ व गोंडपिपरी तालुक्.यातील २१ शाळांचा समावेश आहे. या शाळेतील ८ हजार ९९३ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण मिळणार आहे. दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यांना लाभ मिळणार आहे.