ब्रह्मपुरी तालुक्यातील ३८४ लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:45+5:302021-03-27T04:28:45+5:30
ब्रह्मपुरी : तालुक्यातील बोळधा, रुई, एकारा, हळदा, चौगान या गावांतील सन २०१५-१६ मध्ये घरकूल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ...
ब्रह्मपुरी : तालुक्यातील बोळधा, रुई, एकारा, हळदा, चौगान या गावांतील सन २०१५-१६ मध्ये घरकूल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी या गावातील लाभार्थ्यांची यादी तालुक्यातीलच इतर गावांत समाविष्ट करण्यात आली होती. लाभार्थी एका गावचे आणि गाव दुसरा अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या पाच गावांतील ३८४ लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ घेता आला नाही. मात्र ती त्रुटी दुरुस्त झाल्याने आता पाच गावांतील या लाभार्थ्यांना घरकूल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात ब्रह्मपुरी पंचायत समितीला आदेश प्राप्त झाले आहेत.
राज्य व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे या लाभार्थ्यांसाठी ब्रह्मपुरी पंचायत समिती स्तरावरून २०१६-२७ पासून पाठपुरावा सुरू होता. याची दखल घेत शासनाने ऑनलाइन प्रक्रियेत झालेल्या चुकांची दुरुस्ती करून नव्याने त्या गावांना प्राधान्यक्रम यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झाल्या. लॉगइन आयडीमध्ये वगळलेल्या त्या पाच गावांचा समावेशसुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील बोळधा ६१, एकारा १०४, रुई १३५, चौगान ३८, हळदा ४६ अशा एकूण ३८४ लाभार्थ्यांना याचा लाभ त्वरित घेता येणार आहे. या पाच गावांतील लाभार्थ्यांची चुकीच्या पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे या गावांतील ३८४ लाभार्थी शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या घरकूल योजनेपासून वंचित होते. या पाच गावांतील लाभार्थ्यांची नावे दुसऱ्या गावांच्या यादीत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
दुसऱ्या गावांच्या यादीत नाव असल्याने २०१५-१६ पासून या लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ घेता आला नाही.
मात्र या गावांच्या संदर्भात ऑनलाइन प्रक्रियेत जी चूक झाली ती दुरुस्त करण्यात आली आहे. आता ३८५ लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ घेता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या पाच गावांतील लाभार्थी मोठ्या आशेने आज ना उद्या घरकूल मिळेल, अशी आस बाळगून होते. शेवटी ऑनलाइन प्रक्रियेतील दोष निवारण करण्यात आला आणि या चुकीच्या पद्धतीने झालेली नोंदणी रद्द करून नव्याने ऑनलाइन प्रक्रियेत या गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे येथील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.