जुन्या ३९ सुरक्षारक्षकांना कामावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:03+5:302021-07-02T04:20:03+5:30

वरोरा : वरोरा औद्योगिक परिसराच्या क्षेत्रात असलेल्या साई वर्धा पाॅवर कंपनीत कार्यरत तब्बल ३९ सुरक्षारक्षकांना गुरुवारपासून कामावरून कमी केल्यामुळे ...

39 old security guards fired | जुन्या ३९ सुरक्षारक्षकांना कामावरून काढले

जुन्या ३९ सुरक्षारक्षकांना कामावरून काढले

Next

वरोरा : वरोरा औद्योगिक परिसराच्या क्षेत्रात असलेल्या साई वर्धा पाॅवर कंपनीत कार्यरत तब्बल ३९ सुरक्षारक्षकांना गुरुवारपासून कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.

वरोरा परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता एमआयडीसी परिसरात दोन मोठ्या वीज कंपन्यांना परवानगी देण्यात आली. तेथे हजारो मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. साई वर्धा पाॅवर कंपनी या वीज वितरण कंपनीमध्ये सुरक्षा पुरविण्याचे कंत्राट अभिजित सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात सदर कंपनी एनसीएलटीच्या ताब्यात गेली आणि वर्धा पाॅवर कंपनीचे हस्तांतरण साई वर्धा पाॅवर कंपनीला करण्यात आले. यामध्ये अनेक कंत्राटदारांचे पैसे थकीत असून अभिजित सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीचेही पैसे थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.

या सुरक्षा कंपनीत ३९ सुरक्षारक्षक हे स्थानिक असून त्यांची उपजीविका त्यांच्या नोकरीवर अवलंबून आहे. मात्र कंपनीने नवीन सुरक्षा एजन्सीला हे काम दिल्यामुळे हे सर्व ३९ सुरक्षारक्षक १ जुलैपासून कमी करण्यात आले. नवीन कंपनीत आम्हाला सामावून घ्या आणि थकीत वेतन द्या या मागण्या सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्यामुळे गुरुवारपासून या सर्व सुरक्षारक्षकांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

कोट

सर्व सुरक्षारक्षक हे स्थानिक आहेत. मागील दोन महिन्यांपासून त्यांना वेतन अदा करण्यात आले नाही. कंपनीने थकीत वेतन देण्यास नकार दिला आणि आता हे कंत्राट संपल्यामुळे सर्व सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले आहे.

- नंदकिशोर गव्हाणकर, व्यवस्थापक अभिजित कंपनी

कोट

अभिजित कंपनीचे कंत्राट ३० जूनला संपुष्टात आले आहे. शासकीय कंपनीला नवीन सुरक्षारक्षकांचे काम देण्यात आले आहे. जुन्या सुरक्षारक्षकांच्या रोजगाराची जबाबदारी अभिजित या कंपनीकडे असून त्यांची कोणतीही जुनी थकबाकी नाही.

- ज्ञानेश माटे, व्यवस्थापक, साई वर्धा पाॅवर कंपनी

आता कामावरून कमी केलेल्या स्थानिक सुरक्षारक्षकांना जर नवीन ठिकाणी रोजगार मिळाला नाही तर त्यांचे कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: 39 old security guards fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.