जुन्या ३९ सुरक्षा रक्षकांना कामावरून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:38+5:302021-07-03T04:18:38+5:30
वरोरा : वरोरा औद्योगिक परिसराच्या क्षेत्रात असलेल्या साई वर्धा पाॅवर कंपनीत कार्यरत तब्बल ३९ सुरक्षा रक्षकांना गुरुवारपासून कामावरून कमी ...
वरोरा : वरोरा औद्योगिक परिसराच्या क्षेत्रात असलेल्या साई वर्धा पाॅवर कंपनीत कार्यरत तब्बल ३९ सुरक्षा रक्षकांना गुरुवारपासून कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.
वरोरा परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता एमआयडीसी परिसरात दोन मोठ्या वीज कंपन्यांना परवानगी देण्यात आली. तेथे हजारो मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. साई वर्धा पाॅवर कंपनी या वीज वितरण कंपनीमध्ये सुरक्षा पुरविण्याचे कंत्राट अभिजित सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात सदर कंपनी एनसीएलटीच्या ताब्यात गेली आणि वर्धा पाॅवर कंपनीचे हस्तांतरण साई वर्धा पाॅवर कंपनीकडे करण्यात आले. यामध्ये अनेक कंत्राटदारांचे पैसे थकीत असून, अभिजित सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीचेही पैसे थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.
या सुरक्षा कंपनीतील ३९ सुरक्षा रक्षक हे स्थानिक असून, त्यांची उपजीविका या नोकरीवर अवलंबून आहे. मात्र कंपनीने नवीन सुरक्षा एजन्सीला हे काम दिल्यामुळे हे सर्व ३९ सुरक्षा रक्षक १ जुलैपासून कमी करण्यात आले. नवीन कंपनीत आम्हाला सामावून घ्या आणि थकीत वेतन द्या या मागण्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गुरुवारपासून या सर्व सुरक्षा रक्षकांचा रोजगार हिरावला गेला असून, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
कोट
सर्व सुरक्षा रक्षक हे स्थानिक आहेत. मागील दोन महिन्यांपासून त्यांना वेतन अदा करण्यात आलेले नाही. कंपनीने थकीत वेतन देण्यास नकार दिला आणि आता हे कंत्राट संपल्यामुळे सर्व सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले आहे.
- नंदकिशोर गव्हाणकर, व्यवस्थापक, अभिजित कंपनी
कोट
अभिजित कंपनीचे कंत्राट ३० जूनला संपुष्टात आले आहे. शासकीय कंपनीला नवीन सुरक्षा रक्षकांचे काम देण्यात आले आहे. जुन्या सुरक्षा रक्षकांच्या रोजगाराची जबाबदारी अभिजित कंपनीकडे असून त्यांची कोणतीही जुनी थकबाकी नाही.
- ज्ञानेश माटे, व्यवस्थापक, साई वर्धा पाॅवर कंपनी
कामावरून कमी केलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांना जर नवीन ठिकाणी रोजगार मिळाला नाही तर त्यांचे कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.