३९ हजार ३६७ बहिणींचे महिन्याचे दीड हजार पक्के
By साईनाथ कुचनकार | Published: July 17, 2024 04:24 PM2024-07-17T16:24:14+5:302024-07-17T16:26:42+5:30
‘माझी लाडकी बहीण योजना’ : ऑफलाइन २२,४७६ तर ऑनलाइन १६८९१ अर्ज
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषण तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला, मुलींना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचे जिल्ह्यात ऑफलाइन आणि ऑनलाइन मिळून ३९ हजार ३६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये महिना आता पक्का झाला आहे.
योजनेची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे काही महिलांनी सध्या कागदपत्र जमा करणे सुरू केले आहे. तर काही महिलांचे अद्यापही उत्पन्न दाखले, रेशनकार्ड निघाले नसल्याने त्या तहसील कार्यालयांमध्ये चकरा मारत आहे. तर काही महिला ग्रामपंचायतमध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्याच्या कामात व्यस्त आहे.
३९ हजार ३६७ अर्जामध्ये वैयक्तिकरीत्या भरलेल्या व इतर संस्थांनी भरलेल्या अर्जाचा यामध्ये समावेश नाही. अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.
अशी आहे अर्जांची संख्या
जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने २२ हजार ४७६ तर ऑनलाइन पद्धतीने १६ हजार८९१ असे एकूण ३९ हजार ३६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात शहरी अंगणवाडी केंद्रात (ऑफलाइन ५५२९, ऑनलाइन ३८५९ एकूण ९३८८ अर्ज), ग्रामीण अंगणवाडी केंद्रात (ऑफलाइन १४९३१, ऑनलाइन ११९९४ एकूण २६९२५ अर्ज), चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात (ऑफलाइन १४२९, ऑनलाइन ५३५ एकूण १९६४ अर्ज), जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात (ऑफलाइन ११७, ऑनलाइन ९० एकूण २०७ अर्ज) तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये (ऑफलाइन ४७०, ऑनलाइन ४१३ एकूण ८८३ अर्ज) अर्ज प्राप्त झाले आहेत.