घरी परतत असताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
By राजेश भोजेकर | Published: April 17, 2023 05:36 PM2023-04-17T17:36:44+5:302023-04-17T17:41:19+5:30
मध्यप्रदेशातील नेवरागावाजवळ घडला अपघात
चंद्रपूर : आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी चारचाकी वाहनाने जात असताना एकाच कुटुंबातील तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना दि. १६ ला पहाटेच्या सुमारास नेवरागावाजवळ घडली. अपघातातील परिवार श्रीनगर कॉलनी ब्रम्हपुरी येथील सेवानिवृत्त एस्टी चालक विजय बडोले यांचा असून अपघातात त्यांची पत्नी कुंदा बडोले (५२), मुलगा गिरीश बडोले (३२), व विवाहित मुलगी मोनाली बडोले (चौधरी) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर विजय बडोले (६२) यांचा गोंदियातील रुग्णालयात आज दि. १७ ला मृत्यू झाला. इतर दोन चिमुकले व सून जखमी असून गोंदिया येथे उपचार सुरू आहेत.
ब्रम्हपुरी येथील श्रीनगर कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त बस चालक विजय गणपत बडोले हे आपल्या परिवारासह स्वतःच्या चार चाकी वाहनाने मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना किरणापुर नजिक नेवरागाव कला येथे एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा तोल गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन चारचाकी वाहनाने धडक दिली.
या भीषण अपघातात त्यांची पत्नी कुंदा बडोले, मुलगा इंजी. गिरीश बडोले, विवाहित मुलगी मोनाली चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक सेवानिवृत्त विजय बडोले, यांचा गोंदिया येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. सून बबिता बडोले, दोन लहान चिमुकले नातवंड गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एकाच परिवारातील एकूण सहा जण प्रवास करीत होते. मृतकाचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यातील पहिली घटना आहे. मृतकांवर काल रात्री ११.३०. वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.