सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांचा भाव; नवीन सोयाबीनची आवक सुरू, बाजार समितीमध्ये खरेदीचा शुभारंभ
By साईनाथ कुचनकार | Published: October 10, 2023 06:07 PM2023-10-10T18:07:57+5:302023-10-10T18:08:14+5:30
चंद्रपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
चंद्रपूर : येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावर्षी ४ हजार २००१ रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला आहे. पहिल्या दिवशी सोयाबीन विकण्यासाठी आलेले पिपरी येथील शेतकरी चंदू माथने यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर वैद्य, उपसभापती गोविंदा पोडे, संचालक सुनील फरकाडे, पारस पिंपळकर, सुभाष पिंपळशेंडे, प्रभाकर सिडाम यांची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी माथने यांनी २० पोते सोयाबीन बाजार समितीला विक्री केले. यावेळी बाजार समितीचे अडत्य, व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजार समितीमध्ये सोयाबीन आणताना वाळवून, स्वच्छ करून आणावे, असे आवाहन सभापती गंगाधर वैद्य, उपसभापती गोविंदा पोडे, सचिव संजय पावडे यांनी केले आहे.