चंद्रपुरातील जखमी वाघाजवळ ४० वन कर्मचाऱ्यांचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:50 PM2018-02-24T13:50:21+5:302018-02-24T13:50:29+5:30
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मूरपार उपक्षेत्रांतर्गत भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक पाचमध्ये आढळलेला वाघ अद्याप तवालाजवळच बसून आहे. तो वृद्ध असून जखमीही आहे. वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले असून ४० वन कर्मचारी अहोरात्र वाघावर पहारा ठेवून आहेत.
गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास तो तलावात जावून पाणी प्याला आणि नंतर पुन्हा तिथेच जाऊन बसला.
याची चित्रफित व पशु चिकित्सकाचा अहवाल मुख्य वन संरक्षकांकडे पाठविल्याचे वन विभागाने सांगितले. त्याच्या जखमा व पशु चिकित्सकांच्या अहवालाचे निरीक्षण करून वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी पी.सी.सी.एफ. नागपूर यांनी दिली तरच त्याच्यावर उपचार केले जातील.
त्या बोकडावर बिबट्याचा ताव मारण्याचा प्रयत्न
जखमी वाघाला पकडण्यासाठी त्याच्याजवळ् बांधून ठेवलेल्या बोकडावर रात्री २ वाजताच्या सुमारास एका बिबट्याने ताव मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब जखमी वाघावर पाळत ठेवून असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बिबट्याला तेथून हाकलून लावले.
वाघाच्या मृत्यूची प्रतीक्षा ?
वन्य जीव कायदा १९७२ अंतर्गत जखमी वन्य प्राण्यावर प्राथमिक उपचार करणे बंधनकारक असल्याचे जाणकार बोलत आहे. मात्र ४८ तासानंतरही या जखमी वाघावर कुठलेही प्राथमिक उपचार करण्यात आले नाही. वन विभाग या जखमी वाघाच्या मृत्यूची वाट तर बघत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाघाच्या जखमा तो घेत असलेल्या विश्रांतीने बरा होणारा आहे वा नाही याची शहानिशा वनविभाग करीत आहे. जखमा उपचाराअंतीच बऱ्या होणाऱ्या असतील, तरच त्याला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी मिळते.
- विजय शेळके, मुख्य वनसंरक्षक, वनविभाग, चंद्रपूर.