४० टक्के नागरिकांना ट्युबवेलचे पाणी
By admin | Published: December 27, 2014 01:23 AM2014-12-27T01:23:31+5:302014-12-27T01:23:31+5:30
वरोरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. १९७२ च्या लोकसंख्येनुसार पालिकेने पाणीपुरवठा योजना कर्यान्वित करुन नदीचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करुन दिले.
प्रवीण खिरटकर वरोरा
वरोरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. १९७२ च्या लोकसंख्येनुसार पालिकेने पाणीपुरवठा योजना कर्यान्वित करुन नदीचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करुन दिले. या योजनेला आता ४२ लोटले असून आतापर्यंत या योजनेत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे शहरातील ४० टक्के नागरिक आजही ट्युबवेलचे अशुद्ध पाणी पीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरोरा शहरातील १९७२ या वर्षातील लोकसंख्या वीस हजारापर्यंत होती. त्यावर आधारीत पालिकेने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. शुद्ध पाणी मिळावे याकरिता वरोरा शहरानगजीकच्या तुळाना रस्त्यालगत त्यावेळी जलशुद्धीकरण यंत्र बसवून वर्धा नदीतून तुळाना गावानजीकच्या पात्रातून जलशुद्धीकरणात पाणी आणण्यात येते. याकरिता नदीच्या पात्रावर पंप लावून व उपजिल्हा रुग्णालयानजीक तसेच सावरकर चौकात पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र, सावरकर चौकातील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने त्यात पाणी साठविणे मागील काही वर्षापासून बंद करण्यात आले आहे. सध्या नव्याने बांधण्यात आलेल्या वणी नाका व उपजिल्हा रुग्णालया नजीकच्या पाण्याच्या टाक्यामध्ये शुद्ध केलेले पाणी साठवून नागरिकांना नळाद्वारे दिले जाते. आज या बाबींना ४२ वर्षाचा कालावधी लोटला आहे. आजच्या स्थितीत वरोरा शहराची लोकसंख्या ६० हजारपेक्षा अधिक आहे. मात्र, या नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळत नाही. पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळावे याकरिता अनेक ठिकाणी ट्युबवेल तयार करुन नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.
ट्युबवेलमधून निघणारे पाणी शुद्ध करण्याची कुठलीही यंत्रना पालिकेजवळ नसल्याचे आजही वरोरा शहरातील ४० टक्के नागरीक ट्युबवेलचे अशुद्ध पाणी मागील कित्येक वर्षापासून पीत आहेत. १९७२ मध्ये सुरु झालेल्या न.प. पाणीपुरवठा योजनेचा कालावधी १९९७ मध्ये पूर्ण झाल्याने न.प. प्रशासनाने वरोरा शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव पाठवविला. मात्र, १४ वर्षाचा कालावधी लोटूनही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली नाही.