प्रदूषणामुळे चार वर्षांत ४०० वर नागरिकांचा मृत्यू
By admin | Published: June 5, 2016 12:42 AM2016-06-05T00:42:52+5:302016-06-05T00:42:52+5:30
उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे.
शासकीय रुग्णालय : खासगी रुग्णालयातील मृतांची आकडेवारी अनेकपट
चंद्रपूर : उद्योगांनी व्यापलेल्या चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांचा अक्षरश: श्वास कोंडला जात आहे. मात्र त्यावर अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. गेल्या चार वर्षांत प्रदूषणामुळे झालेल्या आजाराने शासकीय रुग्णालयातील आकडेवारीनुसार ४०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख २२ हजार ७६२ नागरिकांनी उपचार करवून घेतले.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारात या विषयात माहिती घेतली. त्यातून ही आकडेवारी पुढे आली. ही आकडेवारी केवळ शासकीय रुग्णालयातील आहे. खासगी रुग्णालयात उपचार करवून घेणाऱ्यांची व उपचारादरम्यान, मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी यापेक्षा कैकपट असल्याचे एका जाणकाराने सांगितले. चंद्रपुरात महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. यासोबतच जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी कंपन्यांचे पॉवर प्लँट आहेत. तसेच कोळशावर आधारित अनेक उद्योग कार्यरत आहेत. वीज निर्मितीसाठी लाखो टन कोळसा जाळला जातो. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडाय आॅक्साईडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. दमा, हृदयविकार, त्वचारोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजाराची बाधा नागरिकांना होत आहे.
जिल्ह्यात कोळसा खाणींची संख्या अधिक असल्याने कोळशाची वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होते. त्यातून सातत्याने कोळशाची धूळ वातावरणात पसरत असते. या धूळ प्रदूषणानेही नागरिक बेजार आहेत. (प्रतिनिधी)
वृक्षारोपणाबाबत उदासीनता
प्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. मात्र वृक्षारोपणाबाबत कायम उदासिनता दिसून येते. वृक्षारोपण केले जाते. मात्र पुढे त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते, असाच नित्याचा अनुभव आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला चंद्रपूर व अवतीभोवतीच्या १,११७ हेक्टर परिसरात नियमानुसार १० फुटांवर झाडे लावायची होती. त्या झाडांची संख्या ९० लाख ते एक करोड एवढी होते. परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार केवळ ११ लाख ९१ हजार ६६० झाडे लावण्यात आली आहेत. त्यातून ८ लाख ६६ हजार ३५० झाडे जीवंत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आकडेवारीचा अभ्यास केला असता दिलेल्या जबाबदारीपैकी केवळ ८ ते १० टक्के वृक्षारापणाचे काम केल्याचे निदर्शनास येते.