८९ गावांसाठी ४१ कोटींच्या पाणीपुरवठा योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:15 AM2018-08-24T00:15:03+5:302018-08-24T00:16:00+5:30
चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. जिल्ह्यातील या गावांना लवकरच या योजनांचा लाभ मिळणार आहे.
ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यामध्ये शुध्द पेयजल सर्वांना मिळावे, यासाठी प्रत्येक गावांत विविध योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना सुरु केल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून ६१ गावांसाठी १७ योजना मंजूर केल्या असून त्यासाठी १०१ कोटी २६ लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासोबतच अनेक कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून शुध्द पाण्याचे एटीएम (आरो मशीन) सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील ८९ गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. तथापि, २०१५ मध्ये शासनाने या योजनेला स्थगिती दिली होती. केंद्र शासनाच्या या स्थगितीला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी या प्रलंबित योजनांना मान्यता मिळाल्यामुळे प्रत्येक गावांला शुध्द पाणी देण्याच्या प्रयत्नाला गती मिळाली आहे. यासाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
मागील चार वर्षांच्या कालावधीत ना. लोणीकरांनी पाणी पुरवठा विभागाला चांगलीच गती देऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, भारत निर्माण योजना या योजनांमध्ये अपूर्ण असलेल्या योजनांना पूर्ण करण्यावर भर दिल्याचेही नमुद केले आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व जलस्वराज्य टप्पा २ असे एकत्रित मिळून चंद्रपूर जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून १८२ कोटी ८६ लाख रुपये एवढा भरघोस निधी ना. बबनराव लोणीकर यांनी उपलब्ध करून दिला आहे.
८९ गावांना मिळाला फायदा
ज्या गावांमध्ये योजना सुरु होणार आहे, त्यामध्ये चिमूर तालुक्यातील गोरवट, अडेगाव, मिनझरी, पिटीचुवा, खातोडा, कळमगाव, बोथली व भिसी, भद्रावती तालुक्यातील- कडोली, बिजोनी, कोकेवाडा मानकर, कुनाडा व देऊळवाडा, सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव चक, पारणा, नवेगावटोला, चिटकी, सरडपार चक, तांबेगडी मेंढा व नांदगाव, कोरपना तालुक्यातील- वडगाव, हेटी, काटलाबोडी, कुक्कडसात, अंतरगांव बु. उपरवाई, नारंडा, लोणी व जेवरा या गावांचा समावेश आहे. सावली तालुक्यातील कढोली, दोनाळा, पांढरदरा, आक्कापूर, सायखेडा, डोंगरगांव मस्के, जांब बु. कारेगांव चक, विहीरगांव, उसेगाव, बोरमाळा, बेळगाव. चंद्रपूर तालुका- हिंगणाळा, अडेगाव, अंतुर्ला, महाकुर्ला, सोनेगाव, चिंचाळा लहुजी नगर, चोरगाव, बेलसणी, पांढरकवडा, साखरवाई, येरुर, माथारदेवी, खुटाळा, मोरवा. वरोरा तालुका- पिंपळगांव, सातारा, पांझुर्णी, निलजई व शेंबाळा, मूल तालुका- चकघोसरी, केळझर व गडीसुर्ला, नागभीड तालुका- कच्चेपार, मेंढा किरमीटी व पेंढरी. ब्रम्हपुरी तालुका- कन्नाळगाव, चांदगाव, मांगली, हरडोळी, भुज तुकूम, सोनड्री, अ-हेरनवरगाव. जिवती तालुक्यातील सेवादास नगर, कुनागुडा, अंबेझरी, हिमायत नगर, कुंबेझरी, चिखली खु. करनकोंडी. राजूरा तालुका- कळमना, सोंडो, विरुर रोड, चिंचोली खू. गोंडपिपरी तालुका- दरुर, धामनगांव, हिवरा. पोंभूर्णा- भिमनी व फुटाना अशा ८९ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.