मनपाचा ४३१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:28 PM2018-03-27T23:28:48+5:302018-03-27T23:29:21+5:30

चंद्रपूर शहर महानगर पालिकेचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ४३१ कोटी ६६ लाखांच्या अर्थसंकल्पाला विशेष सभेने मंगळवारी मंजुरी प्रदान केली.

431 crore budget approved for Municipal Corporation | मनपाचा ४३१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

मनपाचा ४३१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Next
ठळक मुद्देअंजली घोटेकर यांची माहिती : शहराच्या विकासासाठी कटिबद्ध

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिकेचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ४३१ कोटी ६६ लाखांच्या अर्थसंकल्पाला विशेष सभेने मंगळवारी मंजुरी प्रदान केली. या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने विविध योजना, उपक्रम आणि पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर व स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी मनपाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार ४१६ कोटी ४१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. १५ कोटी २५ लाख शिल्लकीचा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये अमृत अभियानासाठी २५ कोटी, पाणी टंचाईसाठी १० कोटी, शहर विकास निधीत १३.३० कोटी, मनपाच्या मॉडेल स्कूलसाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याणच्या विविध योजनांसाठी ३ कोटी ९ लाख, आर्थिकदृष्ट्या मागास घटकासाठी २ कोटी, दिव्यांग धोरण अंतर्गत विविध बाबींसाठी २ कोटी, स्मशानभूमी निर्माण व सौंदर्यीकरणासाठी ९० लाख महापौर चषकासाठी ३५ लाख, विद्युत व्यवस्था ४ कोटी तसेच स्वच्छ चंद्रपूर अभियानसाठी २५ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
वृक्षारोपण २५ लाख, भूसंपादन ४ कोटी, बगिचा विकास १ कोटी ५० लाख, रैनबसेरा ३० लाख, खुल्या जागेचा विकास १ कोटी, पार्किंग १ कोटी, नाट्यगृह ७० लाख, बचत गट १० लाख आणि मासोळी बाजारासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इतरही कामांसाठी अर्थसंकल्पात भरिव तरतूद करण्यात आल्याची माहिती मनपा महापौर अंजली घोटेकर यांनी दिली. यावेळी भाजप गटनेता वसंत देशमुख उपस्थित होते.
केवळ आकड्यांची अदलाबदल
सत्ताधारी पक्षाने हा अर्थसंकल्प सभागृहात एकमताने मंजुर झाला असल्याचे म्हटले असले तरी विरोधकांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी म्हणजे केवळ मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील आकड्यांची अदलाबदल आहे, अशी टीका काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. मागील वर्षीच्या तुरतुदीनुसार शहरात विकासाची कामेच झाली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कर भरणाऱ्यांना ७५ ते ५० टक्के व्याजावर सवलत
कर वसुलीसाठी महानगर पालिका मोहिमा राबविल्यानंतरही शंभर टक्के वसुली होत नसल्याचे पाहुन महानगर पालिकेने थकित करधारकांसाठी विशेष सवलत सुरू केली आहे. नागरिक कर भरतात, त्यावर शासनाच्या कायद्यानुसार महिना २ टक्के म्हणजेच वार्षिक २४ टक्के कर लावला जातो. ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा केल्यास या व्याजाच्या रकमेवर ७५ टक्के सुट दिली जाणार आहे. १ ते ३० एप्रिलपूर्वी भरणा केल्यास ५० टक्के सुट दिली जाणार असल्याची माहिती महापौर घोटेकर यांनी यावेळी दिली.
दिव्यांग कल्याणनिधीवरून विरोधकांची नारेबाजी
दिव्यांगाच्या कल्याणाकरिता मागील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला निधी खर्च करण्यात आला नाही. मात्र अवास्तव व खोटी आकडेवारी दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करीत शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख, प्रहार अपंग क्रांतीचे निलेश पाझारे आदींनी निदर्शने केली.

Web Title: 431 crore budget approved for Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.