४५ हजार क्विंटल गहू पडून
By Admin | Published: May 13, 2017 12:26 AM2017-05-13T00:26:22+5:302017-05-13T00:26:22+5:30
जिल्हा पुरवठा विभागाने पैशाचा भरणा करूनही शुक्रवारी भारतीय अन्न-धान्य महामंडळाकडून (एफसीआय) गहू मिळाला नाही.
१२ ट्रक गोदामापुढे उभे : चालान भरूनही रेशनचा गहू पोहोचला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा पुरवठा विभागाने पैशाचा भरणा करूनही शुक्रवारी भारतीय अन्न-धान्य महामंडळाकडून (एफसीआय) गहू मिळाला नाही. हमालांअभावी १२ ट्रक पडोली येथील एफसीआयच्या गोदामापुढे दिवसभर उभे होते. त्यामुळे ४५ हजार क्विंटल गव्हाची उचल होऊ शकली नाही. परिणामी रेशन दुकानादारांपर्यंत गहू पोहोचला नाही. शनिवार व रविवारी सुटी आली असल्याने ही प्रक्रिया दोन दिवस लांबणीवर पडली.
जिल्हा पुरवठा विभागातर्फे ४५ हजार क्विंटल गहू आणि ४५ हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात येतो. त्यापैकी तांदळाचा पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करण्यात येते. ते राईल मिलवर भरडून स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना उपलब्ध केले जाते. सध्या जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने आॅनलाईन करण्यात आली आहेत. त्यांचे नियतन आणि पुरवठा आदी आॅनलाईन सुरू करण्यात आला आहे.
पुरवठा विभाग भारतीय अन्न-धान्य महामंडळाकडून गव्हाची खरेदी करते. त्याकरिता पुरवठा विभागाकडून चालान भरणा केला जातो. पैसे भरल्यानंतर त्या पावत्यांच्या आधारे एफसीआयच्या गोदामातून धान्य उपलब्ध केले जाते. ही नियमित प्रक्रिया आहे. परंतु शुक्रवारी त्यात खंड पडला. पुरवठा विभागाने गव्हाची उचल करण्यासाठी सकाळीच पडोली येथील एमसीआयच्या गोदामापुढे १२ ट्रक पाठविले. दोन ट्रकमध्ये गव्हाची पोती भरण्यात आली. मात्र, उर्वरित ट्रक तसेच गोदामापुढे उभे होते. तूर खरेदीसाठी एफसीआयने जिल्ह्यात खरेदी केंद्र उघडले आहे. त्याकरिता एमसीआयच्या अधिकाऱ्यांनी हमालांना तूर खरेदी केंद्रावर पाठविले. परिणामी पुरवठा विभागाचे ट्रक रिकामेच दिवसभर उभे राहिले.
गव्हाची उचल करण्यासाठी पैशाचा भरणा केल्यानंतरही ट्रकमध्ये गव्हाची पोती टाकण्यात आली नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्किन यांना दुपारी मिळाली. त्यांनी चंद्रूपरच्या एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी ट्रकमध्ये गव्हाची पोती भरण्याची मागणी केली. तेव्हा एफसीआयकडे हमाल उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
९६५ दुकानांवर आॅनलाईन प्रक्रिया
जिल्ह्यात १५२४ स्वस्त धान्य दुकान आहेत. त्यांना पीओएस मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९६५ दुकानांमध्ये पीओएस मशीनद्वारे ग्राहकांशी व्यवहार सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात मे महिन्यात २ हजार ३२० क्विंटल गहू, २ हजार ३०८ क्विंटल तांदूळ आणि २७० क्विंटल साखर लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. त्याचा लाभ १६ हजार ८८६ कार्डधारकांना मिळाला आहे.