नगर पंचायतींसाठी 450 नामनिर्देशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:00 AM2021-12-08T05:00:00+5:302021-12-08T05:00:30+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी इच्छुकांना सबुरीचा सल्ला देऊन तिष्ठत ठेवले. परिणामी, नामनिर्देशन अर्ज सादर करणे सुरू झाले तरी कोरपना वगळता अन्य पाचही नगर पंचायतींमध्ये रविवारपर्यंत एकही दाखल झाला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोणवाही नगर पंचायतीच्या एकूण १०२ जागांपैकी २० ओबीसी प्रभाग वगळून अन्य आरक्षित प्रभागांतील ८२ जागांसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी ४५० नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने ओबीसी वगळता सर्व प्रभागांत २१ डिसेंबरला मतदान होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी इच्छुकांना सबुरीचा सल्ला देऊन तिष्ठत ठेवले. परिणामी, नामनिर्देशन अर्ज सादर करणे सुरू झाले तरी कोरपना वगळता अन्य पाचही नगर पंचायतींमध्ये रविवारपर्यंत एकही दाखल झाला नव्हता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा व जिवती नगर पंचायतीत एकाच प्रभागात आणि एकाच पक्षातील अनेकांनी उमेदवारीचा हट्ट धरला होता. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षश्रेष्ठींनी वारंवार बैठका घेऊन तडजोडी केल्यानंतर सोमवारी सायंकाळी उमेदवारीचा तिढा सुटला. त्यामुळे नामनिर्देशन दाखल करण्यास मोठी गर्दी झाली.
गाेंडपिपरीत इंटरनेटअभावी उमेदवारांची ताटकळ
- गोंडपिपरी येथे इंटरनेट सुविधा ठप्प झाल्याने प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला. रात्री सात वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच होती. उमेदवारांना अर्ज दाखलसाठी बराच वेळ ताटकळत राहावे लागले.
निवडणूक रद्द झालेले ओबीसी प्रभाग
जिवती व पोंभुर्णा नगरपंचायत प्रत्येकी ४ ओबीसी आरक्षित प्रभाग आणि सिंदेवाही- लोणवाही, कोरपना, गोंडपिपरी व सावली येेथे प्रत्येकी ३, अशा ३० ओबीसी प्रभागांची निवडणूक सध्या पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आज या प्रवर्गातील उमेदवारांचे नामनिर्देशन स्वीकारण्यात आले नाहीत.
ओबीसी आरक्षित प्रभागांचा निर्णय १३ डिसेंबरनंतर
राज्य निवडणूक आयोगाने नगर पंचायतींमधील ओबीसी प्रभागांतील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांच्या आदेशानुसार, ओबीसी प्रभाग वगळता इतर सर्व प्रभागांत निवडणुका होतील. आरक्षणाबाबत १३ डिसेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी आहे. त्यानंतर निवडणुकांबाबत पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
१६ डिसेंबरला आक्षेप नोंदविता येणार
बुधवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर १३ डिसेंबरला उमेदवारी मागे घेता येईल. शिवाय, कुणाचा आक्षेप असल्यास १६ डिसेंबरला अपील सादर करता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुठलाही बदल झाला नाही तर २१ डिसेंबरला मतदान होणार आहे.
आज सादर करावे लागणार हमीपत्र
चंद्रपूर : नगर पंचायत निवडणुकीकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा पुरावा, तसेच विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास ८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तडजोडी आणि आश्वासने
नगर पंचायत निवडणुकीसाठी बरेच जण आधीपासूनच कामाला लागले होते. मात्र, पक्षाकडून आपल्या उमेदवारीला मान्यता मिळेल की नाही, यासाठी आटापीटा सुरू होता. पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी इच्छुकांची मनधरणी केली. तडजोडी करून काहींना आश्वासने दिल्याने नामांकन दाखल केल्याचे दिसून आले.