४५१ गावांमध्ये हिवतापाची साथ

By Admin | Published: April 25, 2017 12:27 AM2017-04-25T00:27:19+5:302017-04-25T00:27:19+5:30

जगभरात हिवताप हा मृत्यूचे कारण असणारा मुख्य आजार असून जागतिक स्तरावर हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूची दखल घेऊन ....

451 villages with malaria | ४५१ गावांमध्ये हिवतापाची साथ

४५१ गावांमध्ये हिवतापाची साथ

googlenewsNext

आज जागतिक हिवताप दिन : जिल्ह्यात प्रत्येक मंगळवार कोरडा दिवस
चंद्रपूर : जगभरात हिवताप हा मृत्यूचे कारण असणारा मुख्य आजार असून जागतिक स्तरावर हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूची दखल घेऊन जनजागृतीस्तव प्रती वर्षी २५ एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिवताप दिवस’ म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यातील एकूण १६०८ गावांपैकी केवळ ४५१ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात हिवतापाचे रुग्ण आढळून आले असून मागील दोन वर्षापासून जनसामान्याचे सतर्कतेने हिवताप निर्मूलन ही जन चळवळ ठरून जिल्ह्यातील हिवताप रुग्ण संख्येत घट नोंदविण्यात आली आहे.
हिवतापाचा प्रसार होण्यास डास, दूषित रुग्ण व वातावरण कारणीभूत ठरत असते. चंद्रपूर जिल्ह्यात हिवतापाचा प्रसार प्रामुख्याने दोन प्रकारच्या डासाच्या जातीमुळे होतो. अ‍ॅनाफेलिस स्टेफनसाय डासाची मादी शहर विभागात व अ‍ॅनाफेलिस क्युलिसीफेसीस डासांची मादी ग्रामीण भागात हिवतापाचा प्रसार करते. अ‍ॅनाफेलीस डासाची मादी स्वच्छ पाण्यात, रांजण, माठ, टाके, कुलर्स, पाण्याच्या टाक्यात एक दिवसाआड एका वेळी २०० ते २५० अंडी घालते. पावसाळ्यात डासांना पोषण वातावरण निर्माण झाल्यामुळे डासांचे जीवनमान वाढते व पर्यायाने हिवताप रुग्ण संख्येत वाढ होते.
रक्त नमुना तपासणीत रुग्ण दूषित आढळल्यास जंतूच्या प्रकारानुसार, वयोगटानुसार समूळ उपचार आरोग्य दिला जातो. रुग्णांना समूळ उपचार न झाल्यास मेंदूचा हिवताप होऊ शकतो व रक्तक्षय, किडणीचे आजार होऊन रुग्ण दगाऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर औषधोपचार उपलब्ध असल्यामुळे जनतेने उपलब्ध आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हिवतापाकरिता संवेदनशील असलेल्या छत्तीसगड, आंध्रप्रदेश व इतरही राज्यात जाणाऱ्या आणि गडचिरोली या अतिसंवेदनशील जिल्ह्यात जाणाऱ्या मजुरांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातून किंवा उपकेंद्रातून डॉक्सिसायक्लीन या औषधाचा साठा सोबत घेऊन वास्तव्य कालावधीत नियमित सेवन करावे. शौचालयाचे व्हेंट पाईपला जाळ्या बांधण्यास डासांवर नियंत्रण ठेवता येते. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे वापरल्यास डासाच्या चाव्यापासून बचाव करता येतो. कीटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी घरातील व घराचे समोरील परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून दोनदा सर्व पाण्याची भांडी कोरडी करणे, वाळविणे, कोरडा दिवस पाळणे हा उपाय आहे.
चंद्रपूर जिल्ह्याकरिता प्रत्येक मंगळवार हा कोरडा दिवस शासनाने घोषित केला आहे. सर्व पाण्याची भांडी झाकून ठेवणे, खत खड्डे गावापासून दूर ठेवणे, नाल्या नाहत्या करणे, पडीत विहीरी बुजविणे अथवा गप्पी मासे सोडण्यासाठी शासकीय, निमशासकीय, अधिकारी, पदाधिकारी, महिला मंडळ, बचत गट, सेवाभावी संस्था, शिक्षण संस्थांनी हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी सामाजिक बांधिलकी समजून नियमित सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

रक्त तपासणीसाठी जिल्हाभरात सुविधा
हिवतापाचे निदान करण्यासाठी रक्ताची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनामार्फत रक्त नमुना तपासणीची मोफत सोय गावागावातून उपलब्ध करण्यात आली असून रक्त नमुना तपासणीकरिता चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ११ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये, १ जिल्हा सामान्य रुग्णालय, १ वैद्यकिय महाविद्यालय येथे प्रशिक्षित तज्ज्ञ तपासणीस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात रक्त नमुने गोळा करण्याकरिता आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षित केलेले आहे. तसेच उपकेंद्र स्तरावर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांचे मार्फत रक्त नमुने गोळा करून संबंधीत प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात येतात.

Web Title: 451 villages with malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.