चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरीता 456 कोटी मंजूर!

By राजेश भोजेकर | Published: February 7, 2024 04:34 PM2024-02-07T16:34:16+5:302024-02-07T16:34:24+5:30

विशेष म्हणजे जिल्ह्यासाठी असलेल्या मंजूर नियतव्ययापेक्षा 152 कोटी रुपये जिल्ह्याला अतिरिक्त मिळणार आहेत.

456 crore approved for the next financial year for the development of Chandrapur district! | चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरीता 456 कोटी मंजूर!

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरीता 456 कोटी मंजूर!

चंद्रपूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे आगामी 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी 456 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यासाठी असलेल्या मंजूर नियतव्ययापेक्षा 152 कोटी रुपये जिल्ह्याला अतिरिक्त मिळणार आहेत.

शासनाने सन 2024-25 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरीता 304 कोटींचा नियतव्यय मंजूर केला होता. मात्र हा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय कमी असल्याने यात वाढ करून जिल्ह्यासाठी 450 कोटी मंजूर करावे, अशी आग्रही मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 8 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. या मागणीला वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी तत्काळ अनुकूलता दर्शविली. त्यानुसार पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केलेल्या वाढीव मागणीनुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने 456 कोटी रुपये मंजूर केले. याबाबतचे आदेश जिल्हा नियोजन समितीला 6 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झाले आहेत.

राज्यस्तरीय बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडून करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर जिल्हा योजनेचा नियतव्यय अंतिम करताना कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी, जिल्ह्याचे वैशिष्ट, गरजा तसेच शासनाची प्राथमिकता इत्यादी बाबी विचारात घेऊन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 करीता एकूण रुपये 456 कोटी (आकांक्षित तालुका व नागरी भागासाठी विशेष अतिरिक्त नियतव्ययासह) नियतव्यय शासनाने अंतिमत: मंजूर केला आहे.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027-28 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत उभारण्याचे महत्वाकांक्षी लक्ष निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. सदर आराखड्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध विकास क्षेत्र व उपक्षेत्र यासंदर्भात आखण्यात आलेल्या उपक्रम/योजना/प्रकल्प यासाठी राज्य/केंद्र व जिल्हा वार्षिक योजनेद्वारे निधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतिम मंजूर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यानुसार निश्चित केलेल्या जिल्ह्याच्या आर्थिक वाढीच्या धोरणांवर खर्च करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत.

जिवती आकांक्षित तालुका म्हणून घोषित
नीती आयोगाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा तालुका आकांक्षित तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. आकांक्षित तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवती तालुक्यासाठी 5 कोटी इतका निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 37.83 कोटी रुपये
राज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता विचारात घेऊन, सन 2024-25 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्ह्यासाठी 37.83 कोटी इतका विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करण्यात आला आहे.

या बाबींसाठी राहणार राखीव निधी
नियोजन विभागाच्या 18 ऑक्टोबर 2023 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद नावीन्यपूर्ण योजना, शाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्रीसाठी 5 टक्के निधी, महिला व बालविकास विभागाच्या सर्वसमावेशक योजनांसाठी 3 टक्के, गृह विभागाच्या योजनेसाठी ३ टक्के, शालेय शिक्षण विभागाच्या सर्वसमावेशक योजनांसाठी 5 टक्के, सांस्कृतिक कार्य विभागाच्या गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादीचे संवर्धन या योजनेसाठी 3 टक्के, महसूल विभागाच्या गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेसाठी कमाल 5 टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 456 crore approved for the next financial year for the development of Chandrapur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.