४६ अंशाचा पारा अंगावर झेलतोयं बळीराजा !
By admin | Published: May 27, 2016 01:10 AM2016-05-27T01:10:53+5:302016-05-27T01:10:53+5:30
निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे.
बळीराजा पुन्हा व्यस्त : रखरखत्या उन्हात मशागतीच्या कामांना वेग
प्रकाश काळे गोवरी
निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची शेती विषयीची उदासीनता, यामुळे शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करुनही शेवटी हाती काहीच शिल्लक राहत नाही. केलेली मेहनतही व्यर्थ ठरते. परंतु पुन्हा उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून ४६ अंश सेल्सीअस तापमानात शेतीच्या मशागतीत बळीराजा व्यस्त झाला आहे. कुटुंबियांची पोटाची खडगी भरावी, या एकमेव आशेपोटी स्वत:चे अंग होरपळून काढत आहे.
कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्ग आजकाल लहरीपणाने वागायला लागला आहे.
यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्यानंतर मायबाप सरकारनेही तोकडा दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. उत्पादनापेक्षा खर्च अधिक वाढल्यने यावर्षी खर्च केलेला पैसा निघाला नाही. परिणामी शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण समजला जातो. उन्हात बाहेर पडले तर जीव कासावीस होतो.
एवढे तप्त ऊन्ह आहे. अशा रणरणत्या उन्हात शेतीची कामे करणे म्हणजे जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. बि-बियाणे घ्यायलाही शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. उत्पादनात घट आल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेती कसायची सारी इच्छाच मरुन गेली आहे. मात्र कुटुंबियांचे उपाशी पोट आजही त्याला स्वस्थ बसू देत नाही. बळीराजा ४६ अंशाचा पारा अंगावर झेलत मशागतीची कामे करीत आहे. ना निसर्गाची साथ, ना शासनाचा मदतीचा हात.
शेतकऱ्यांचा वाली कोणीच उरला नाही. त्यामुळे शेतकरी पार वैतागून गेला आहे. मात्र वास्तवाशी झुंज देत जगणे हेच शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.