६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात

By admin | Published: April 8, 2017 12:38 AM2017-04-08T00:38:53+5:302017-04-08T00:38:53+5:30

चिन्ह वाटप होण्यापूर्वीच महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे.

460 candidates for 66 seats in the fray | ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात

६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात

Next

आज चिन्ह वाटप : ४० उमेदवारांनी सोडले रणांगण
चंद्रपूर : चिन्ह वाटप होण्यापूर्वीच महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. चंद्रपूरच्या तापमानासोबतच निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. आज शुक्रवारी नामांकन परत घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने आज तब्बल ४० उमेदवारांनी आपले नामांकन परत घेऊन रणांगणाला पाठ दाखविली. आता ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात आहे. जागांचा हिशेब केला तर त्या तुलनेत रिंगणातील उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मतांचेही विभाजन होऊन निवडणुकीची चूरस वाढणार आहे.
मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तशी उमेदवारांची लगबगही वाढत असल्याचे दिसून येत आहे.
येत्या १९ एप्रिलला मनपा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ आता ११ दिवसच मिळणार असल्याने उमेदवारांची झोप उडाली आहे. ३ एप्रिलला नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ५२७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यानंतरच्या छाननीत १२ उमेदवारांचे नामांकन अपात्र ठरविण्यात आले. यंदाची मनपा निवडणूक सर्वच पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. भाजप-सेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटल्याने सर्वच पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेर. भाजपाने सर्व ६६ जागांवर उमेदवार उभे केले. काँगे्रसने बंगाली कँप प्रभागातील महिला गटातील उमेदवार वगळता ६५ जागांवर उमेदवार उतरविले. राष्ट्रवादी काँग्रेसने ३१, शिवसेनेने ६१ तर मनसेने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या सोबतच विदर्भ माझा पार्टी प्रथमच रिंगणार उतरली असून ८ उमेदवार उभे केले आहेत. अद्याप चिन्ह वाटप झाले नसले तरी जवळजवळ सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवसांपूर्वीपासूनच थेट मतदारांपर्यंत पोहचत प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी नामांकन अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. सकाळपासूनच निवडणूक प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या झोन कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या नोंदी घेतल्या जात होत्या. प्रारंभी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेत नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या तब्बल ४० उमेदवारांनी आज निवडणुकीपासून दूर राहण्याचा घेतला आहे.
दरम्यान, ८ एप्रिलला रिंगणात शिल्लक असलेल्या ४६० उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यानंतर शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. (शहर प्रतिनिधी)

असे आहेत झोननिहाय उमेदवार
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या निवडणुकीसाठी शहरात पाच झोन तयार केले आहेत. यातील झोन क्रमांक १ मध्ये ११ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. आता या झोनमध्ये रिंगणात ९१ उमेदवार आहेत. झोन क्रमांक २ मध्ये चार उमेदवारांनी नामांकन परत घेतले. रिंगणात ७१ उमेदवार आहेत. झोन क्रमांक ३ मध्ये सहा उमेदवार माघारी परतले. रिंगणात ६७ उमेदवार आहेत. झोन क्रमांक ४ मध्ये १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतले. आता रिंगणात १२२ उमेदवार आहेत. तर झोन क्रमांक ५ मध्ये पाच उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. येथे १०९ उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजे संपूर्ण ६६ जागांसाठी आता एकूण ४६० उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

अद्ययावत माहिती देण्यास दिरंगाई
ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती केली आहे. मनपाने या प्रक्रियेसाठी पाच झोन तयार केले आहेत. मात्र प्रसारमाध्यमांना निवडणुकीची अपडेट व अद्ययावत माहिती देण्यास कमालीची दिरंगाई केली जात आहे. मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रसारमाध्यमांनी माहिती विचारल्यास बरीच माहिती त्यांच्याकडेही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.

नामांकन मागे घेणाऱ्या उमेदवारांची नावे
अर्चना गायकवाड, देविदास उदार, सुरेखा बोेंडे, ममता फंदी, पूजा तिवारी, महेश धात्रक, शरयू रामटेके, मंदा सहारे, दीपक भट्टाचार्य, लक्ष्मण फंदी, राघोबा आलाम, अमित बनकर, मोतीलाल सरकार, प्रफुल्ल ढोणे, अशोक भोमा, संभाजी वाघमारे, प्रमोद क्षीरसागर, संजय सहारे, सुधाकर कातकर, जगन पचारे, रतन शिल्लावार, वामन आमटे, ज्योती रंगारी, अब्दुल नजीब अब्दुल गफूर, शेख मुस्ताक शेख मकसूद, सैय्यद समीर सैय्यद बहादूर, मंगल दुर्गे, संदीप देव, एकता गुरले, मिना गरडवार, कालीदास धामनगे, नितीन भागवत, गणेश रासपायले, रवींद्र वनसिंघे, राजश्री कृष्णापूरकर, राजेंद्र निचकोल, रवींद्र वाळके, रेवत सिध्दार्थ दुधे, हनुमान चौखे, शुभांगी खनके.

Web Title: 460 candidates for 66 seats in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.