४,६१९ शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 05:00 AM2022-02-20T05:00:00+5:302022-02-20T05:00:43+5:30
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीखालील क्षेत्रात यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळाले. सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत होते.
दिलीप फुलबांधे
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा: सावली तालुक्यातील खरीप २०२१ या वर्षीच्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील धान पिकाचे कापणीपूर्व व कापणीनंतर अवकाळीच्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासन व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित यंत्रणेमार्फत पंचनामे करण्यात आले होते. यातील चार हजार ६१९ शेतकऱ्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षा आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीखालील क्षेत्रात यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळाले. सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत होते.
धान पीक हातात आलेले असतानाच कापणी बांधणीदरम्यान अनेकदा अतिवृष्टी होऊन धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही भागातील धानाच्या सरड्या वाहून गेल्या. प्रचंड मनस्ताप सहन करीत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. शासन व विमा कंपन्यांनी शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे व सर्वेक्षण केले.जिल्हा प्रशासनासह राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे,मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शासकीय सर्व सोपस्कार आटोपले असले तरी शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत.
खरीप २०२१-२२ या वर्षात सावली तालुक्यातील २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी २३ हजार ९५८ हेक्टरवर भात पिकाची लागवड केली होती,यापैकी चार ६१९ एवढ्या भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. या शेतकऱ्यांना आता विम्याची रक्कम हवी आहे.