संचारबंदीत जप्त केली ४८ लाखांची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:03+5:302021-05-03T04:23:03+5:30
चंद्रपूर : संचारबंदीच्या काळात पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वातील ...
चंद्रपूर : संचारबंदीच्या काळात पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने ठिकठिकाणी कारवाई करीत तब्बल ४८ लाख २८ हजार ६०० रुपयांची दारू आणि वाहने असा एकूण ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १२ दारुतस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
संचारबंदीच्या काळात दुसऱ्या राज्यातून दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. ही बाब ओळखून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दारूतस्करांवर पाळत ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पथके गठीत केली. ही पथके जिल्ह्यात सर्वत्र गस्त घालत आहेत. मागील महिनाभरात या पथकांनी ठिकठिकाणी कारवाया केल्या आहेत. या कारवाईत ४८ लाख २८ हजार ६०० रुपये किमतीची देशी, विदेशी दारूसाठा जप्त केला. तसेच ३७ लाख ५० हजार रुपये किमतीची ६ वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनात २ स्कार्पिओ, २ मारोती कार, १ पिकअप या वाहनांचा समावेश आहे, तर १२ दारुतस्करांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदीच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईने दारू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
--
एकाच रात्री केल्या तीन कारवाया
तेलंगणा राज्यातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाहन चालक पसार झाला. ही गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. त्याच रात्री बल्लारपूर आणि रामनगर पोलीस ठाणे हद्दीतही कारवाई करीत दारूसाठा जप्त करण्यात आला.