४८ हजार ८८४ शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:52 PM2024-05-14T13:52:29+5:302024-05-14T13:53:16+5:30
Chandrapur : प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पीक विमा संरक्षित क्षेत्र ३ लाख २७ हजार ९१८ हेक्टर आहे. ४८ हजार ८८४ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला. नुकसानभरपाईची रक्कम २५ कोटी ३१ लाख एवढी आहे. प्रलंबित प्रकरणे कृषी विभाग व विमा कंपनीने समन्वयातून निकाली काढावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतीक कारपेनवार, कंपनीचे प्रतिनिधी, दूरदृष्यप्रणालीद्वारे तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, यापूर्वीच्या पंचनाम्याची प्रलंबित प्रकरणे एकमेकांच्या समन्वयातून निकाली काढावी.
नियोजनबद्ध कार्यप्रणाली तयार करा. प्रलंबित प्रकरणांचा तालुका कृषी अधिकारी यांनी तालुकास्तरावर आढावा घ्यावा. विमा कंपनी आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी योग्य पद्धतीने काम करावे. जिल्ह्यातील पीक विम्याची माहिती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी बैठकीत सादर केली.
अशी आहे विम्याची स्थिती (२०२३-२४)
शेतकरी- ३ लाख ५० हजार ९७६, विमा संरक्षित क्षेत्र- ३ लाख २७ हजार ९१८ हेक्टर, भरपाई २५ कोटी ३१ लाख, लाभार्थी शेतकरी- ४९ हजार ८८४, भात विमा संरक्षित क्षेत्र- १ लाख ३२ हजार ३८९ हेक्टर (७०.३२ टक्के), कापूस-१ लाख १८ हजार ६०६ (६७.६९ टक्के) सोयाबीन-६२२७४ (९१.९० टक्के)