नागभीड तालुक्यात ४८ हजार सातबाराधारक शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 AM2021-09-15T04:33:26+5:302021-09-15T04:33:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड तालुक्यात ४८ हजार २४७ सातबाराधारक आहेत. या सर्व सातबाराधारकांना २ ऑक्टोबरपासून घरपोच सातबारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुक्यात ४८ हजार २४७ सातबाराधारक आहेत. या सर्व सातबाराधारकांना २ ऑक्टोबरपासून घरपोच सातबारा देण्याची मोहीम शासनाकडून राबविण्यात येणार आहे. नागभीड तालुक्यातही ही मोहीम सुरू होत असल्याचे संकेत आहेत.
शेतकऱ्यांना विविध कामासाठी वर्षभर त्याच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्याची गरज भासत असते. शेतकरी अनेकदा या सातबारा उताऱ्यासाठी तलाठ्याकडे जात असले तरी तलाठी हजर मिळत नाही. कधी कधी तर आर्थिक पिळवणूकही करण्यात येते. शेतकऱ्यांना हा मानसिक व आर्थिक त्रास या सातबारा वितरणाने वाचणार आहे. याशिवाय काहींना सातबारा उताऱ्याचे काम पडत नसल्याने ते या सातबारा उताऱ्याकडे फिरकूनही पाहत नाही. काही वेळेस सातबारा उताऱ्यात चुकून चुकीच्या नोंदी दर्ज होत असतात. याचे परिणाम संबंधित शेतकऱ्यांना भोगावे लागतात. प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात सातबाराचा उतारा आला तर चुका लक्षात येऊन त्याचे परिमार्जन करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना अवधी मिळू शकतो.
नागभीड तालुक्यात ४ राजस्व निरीक्षण मंडळ असून या चार रा.नि.मंडळात २५ तलाठी साझे आणि १३८ गावे आहेत. नागभीड मंडळात येणाऱ्या कानपा साझ्यात १ हजार २१५, मोहाळीत १ हजार २८१, डोंगरगाव १ हजार १६४, बाम्हणी१ हजार ३७६, नागभीड ३ हजार १०९ आणि नवखळा साझ्यात २ हजार ३२२ शेतकऱ्यांचे सातबारा क्रमांक आहेत. मेंढा ( किरमिटी) रा.नि.मंडळातील पाहार्णी साझ्यात २ हजार ०९०, मौशी २ हजार ०७४,मेंढा (किर) ८८०, पारडी ठवरे १ हजार ६३, नवेगाव पांडव १ हजार २४१ आणि कोर्धा साझ्यात १ हजार ६४६ सातबारा क्रमांक आहेत.
तळोधी ( बाळा) राजस्व निरीक्षण मंडळात ७ तलाठी साझे आहेत. गोविंदपूर साझ्यात २ हजार ०२२ सातबारा क्रमांक आहेत. नांदेड येथे १ हजार ६६५, गिरगाव २ हजार ७५६, कोजबी माल २००५, तळोधी (बाळा), २ हजार ५३३, सावरगाव ३ हजार २९८ तर वाढोणा साझ्यात २ हजार ८६१ सातबारा आहेत. मिंडाळा रा.नि.मंडळात ६ तलाठी साझे आहेत. मिंडाळा तलाठी साझ्यात १ हजार ३६५, कोसंबी गवळी १ हजार २४७, बाळापूर बुज २३३५,पळसगाव खुर्द २ हजार ०९९, किटाळी बोर २ हजार १४१ आणि मेंढा दाखली उश्राळ या तलाठी साझ्यात २ हजार ४५९ सातबारा क्रमांक आहेत.