भिवकुंड नाल्याच्या पुनरुज्जीवनासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:24 AM2017-09-01T00:24:09+5:302017-09-01T00:24:25+5:30
राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनर्जीवन कार्यक्रमासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनर्जीवन कार्यक्रमासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने यासंदर्भात १० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केले आहे.
जलयुक्त शिवार अभियान या शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नदी, नाले, ओढा यातील गाळ काढणे, सरळीकरण व खोलीकरण करणे ही कामे लोकसहभागातून करून या स्त्रोतांचे पुर्नजीवन करण्याचा कार्यक्रम राबविला जातो. नदी पुर्नजीवन कार्यक्रमांतर्गत भिवकुंड नाल्याचे पुनर्जीवन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने नवीन सिमेंट नालाबांध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
भिवकुंड नाला हा विसापूर गावानजिक असलेले प्राचीन जलस्त्रोत आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर निधीच्या माध्यमातून सदर नाल्याच्या पुनर्जीवन कार्यक्रमातून लघु सिंचनाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे.