आत्मनिर्भरतेसाठी ५ हजार २० पथविक्रेत्यांना मिळाले १० हजारांचे कर्ज

By साईनाथ कुचनकार | Published: September 22, 2023 04:46 PM2023-09-22T16:46:00+5:302023-09-22T16:47:32+5:30

पीएम स्वनिधी योजना : अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

5 thousand 20 street vendors got a loan of 10 thousand for self-sufficiency | आत्मनिर्भरतेसाठी ५ हजार २० पथविक्रेत्यांना मिळाले १० हजारांचे कर्ज

आत्मनिर्भरतेसाठी ५ हजार २० पथविक्रेत्यांना मिळाले १० हजारांचे कर्ज

googlenewsNext

चंद्रपूर : प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ५०२० पथविक्रेत्यांनी घेतला आहे. योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या विविध बँकांचा गौरवपत्र देऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पीएम स्वनिधी योजनेत सर्व बँकांकडे एकूण ९ हजार ७०९ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ७ हजार ४१९ अर्जधारक पात्र ठरले. यातील ५ हजार २० अर्जधारकांना कर्ज देण्यात आले आहे.

पथविक्रेत्यांनी केलेल्या अर्जाची छाननी करून विहित मुदतीत अर्ज निकाली काढणाऱ्या व ७० टक्क्यांहून अधिक प्रकरणे मंजूर करणाऱ्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, पीएनबी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूको बँक व युनियन बँक ऑफ इंडिया या ११ बँकांना त्यांच्या कार्यासाठी गौरवपत्र देण्यात आले.

चंद्रपूर महानगरपालिका येथे यासंदर्भात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मनपाच्या वतीने स्वनिधी से समृद्धी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानासंदर्भात बैठक घेऊन पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

आत्मनिर्भरतेसाठी योजना

पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरिता एका वर्षासाठी विनातारण १० हजार रुपयांचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकामार्फत देण्यात येते. चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरिता ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू आहे. सर्व पथविक्रेत्यांनी १० हजार रुपये कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत धोंगळे यांच्यासह इतर बँकेचे प्रबंधक, शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख, रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, खडसे, लोणारे, मुन, करमरकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: 5 thousand 20 street vendors got a loan of 10 thousand for self-sufficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.