चिमुरात तिसरी लाट थोपवण्यासाठी ५० खाटांचे डीसीएचसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:32+5:302021-06-01T04:21:32+5:30
आतापर्यंत ६८ रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत ३७१२ रुग्ण पॉझिटिव्ह फोटो ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मंजुरी : औषधी, इंजेक्शनचा साठा मुबलक राजकुमार ...
आतापर्यंत ६८ रुग्णांचा मृत्यू
आतापर्यंत ३७१२ रुग्ण पॉझिटिव्ह
फोटो
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मंजुरी : औषधी, इंजेक्शनचा साठा मुबलक
राजकुमार चुनारकर
चिमूर : चिमूर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने आरोग्य विभाग चांगलाच हादरून गेला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेतून धडा घेत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली असून, त्याअंतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचा सर्व सोयीयुक्त 'डीसीएचसी' रुग्ण कक्ष उभारण्यात येत आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेमध्ये बालकांवर अधिक परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन खाटांसह अद्ययावत असा कक्ष उभारण्यात येत आहे. या कक्षात सर्वच्या सर्व खाटा ऑक्सिजनसह सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे औषधी, ऑक्सिजन कान्सेन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडरचा साठा, रेेडेसिविर, सिरम इंजेक्शन आणि इतर अनुषंगिक तयारी देखील प्रशासनाने केली आहे, तर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
बॉक्स
९० ऑक्सिजन सिलिंडरचा साठा
चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी केंद्रात ४७ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, ४३ लहान सिलिंडर, तर ४५ ऑक्सिजन काॅन्सेन्ट्रेटरचा साठा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी उपलब्ध आहे.
बॉक्स
दोन केंद्रांतून होते कोरोना चाचणी
चिमुरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे, तर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात अँटिजन चाचणी केली जाते. अशा दोन केंद्रांतून कोविडची चाचणी केली जात आहे.
बॉक्स
दोनशे बेडचा विलगीकरण कक्ष
शासकीय वसतिगृहात २०० बेडचा विलगीकरण कक्ष कोविड केअर सेंटरमध्ये सुरू आहे. सोबतच डीसीएचसी मध्ये ५० बेडचे उपचार सेंटर आहे. यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येतात.
बॉक्स
तालुक्यात तीन हजार ७१२ रुग्ण
चिमूर तालुक्यात पहिल्या लाटेत १० हजार ३८१ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर २५ मार्च २०२१ पासून दुसऱ्या लाटेत १० हजार ३७९ चाचण्या केल्या. त्यात दोन हजार ८५५ रुग्ण दुसऱ्या आढळले. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुसऱ्या लाटेने मोठा विळखा घातला होता. चिमुरात एकूण २० हजार ७६० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी आतापर्यंत एकूण तीन हजार ७१२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले, यामध्ये तालुक्यातील एकूण ६८ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. ही लाट काही प्रमाणात कमी झाली असून, आजघडीला २२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
कोट
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट थांबवण्यासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी सेंटरमध्ये ५० बेडच्या ऑक्सिजनच्या पाइपलाइनसह अद्यावत रुग्णालयाचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. या तिसऱ्या लाटेसाठी औषधी, इंजेक्शन उपलब्ध करून ठेवली आहेत. सोबतच ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन निर्मिती केंद्रास मंजुरी मिळाली असून, ते कामसुद्धा सुरू होत आहे.
- गो. वा. भगत,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर.