फाॅरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांचा गंडा

By परिमल डोहणे | Published: February 23, 2024 10:13 PM2024-02-23T22:13:35+5:302024-02-23T22:13:53+5:30

सहा जणांची फसवणूक : आठ ते दहा टक्के परताव्याचे दिले आमिष

50 lakhs in the name of investment in forex trading | फाॅरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांचा गंडा

फाॅरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांचा गंडा

परिमल डोहणे, चंद्रपूर : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास आठ ते दहा टक्के प्रति महिना परतावा देण्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील सहा जणांची तब्बल ५० लाख ४३ हजार ४९९ रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात उघडकीस आला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी श्रीकांत मधुकर साळुंखे (३५, रा. बालाजी वॉर्ड, चंद्रपूर) याच्यावर कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

श्रीकांत साळुंखे याचे फॉरेक्स ट्रेडिंगचे कार्यालय भावानजीभाऊ शाळेच्या मागे आहे. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास आठ ते दहा टक्के प्रति महिना परतावा मिळतो, असे आमिष श्रीकांत अनेकांना दाखवायचा. एखाद महिना त्यांना त्याचा परतावा द्यायचा. त्यानंतर तो कोणताही परतावा देत नव्हता, गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाची मागणी केल्यास तो त्यांना टाळाटाळ करायचा. कार्यालयातही तो उपस्थित राहत नव्हता. तसेच त्याचा फोनही बंद राहत होता.

असाच प्रकार चंद्रपुरातील सूरज जयस्वाल याच्यासोबत घडला. त्याने माहिती घेतली असता त्याच्यासह अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे सूरज जयस्वाल याने सात लाख ४३ हजार ४९९ रुपये, गजानन चिंतावर २३ लाख, प्रवीण नंदूरकर पाच लाख, शेख खालीद शेख कादर आठ लाख, संदीप वाकळे तीन लाख, स्वाती कामडे चार लाख असे एकूण ५० लाख ७३ हजार ४९९ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात २२ फेब्रुवारी रोजी केली. पोलिसांनी लगेच श्रीकांत साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस सुरेंद्र उपरे करीत आहेत.

फसवणूक झाली असल्यास संपर्क करा

श्रीकांत साळुंखे याने गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असेल तर रामनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रामनगर पोलिसांनी केले आहे.

Web Title: 50 lakhs in the name of investment in forex trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.