चंद्रपुरातील ५० हून अधिक नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा
By परिमल डोहणे | Published: March 20, 2024 07:52 PM2024-03-20T19:52:47+5:302024-03-20T19:53:06+5:30
सिंधुदुर्ग जि. प.चा भोंगळ कारभार : इतर जिल्ह्यांतील नवनियुक्त शिक्षकांना मिळाली नियुक्ती
परिमल डोहणे
चंद्रपूर : मागील बऱ्याच वर्षांनंतर रखडलेल्या शिक्षक भरतीला सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुहूर्त मिळाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत समुपदेश प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीही देण्यात आली. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ मार्च रोजी नियुक्ती देऊन काही तासांतच निवडणुकीपूर्वी शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या केल्यानंतरच नवीन शिक्षकांच्या भरती करण्याचे मंत्रालयाचे आदेश धडकल्याचे कारण पुढे करून नियुक्ती आदेश परत घेण्यात आले. दरम्यान, १४ मार्चच्या आत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याने नवनियुक्त शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. सिंधुदुर्ग जि. प.मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पन्नासावर शिक्षक लागले होते. इतर जिल्ह्यांत सर्वांना नियुक्ती मिळाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे सिंधुदुर्ग येथे लागलेल्या नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
सन २०२२ मध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्या. तब्बल दोन वर्षांनंतर सन २०२४ मध्ये पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. संपूर्ण राज्यभरात ४ मार्चपासून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर ८ मार्चपासून समुपदेश प्रक्रिया होऊन नियुक्ती देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील मराठी माध्यमांच्या ६०४, तर उर्दू माध्यमासाठी ११, अशा एकूण ६१५ जागांसाठी समुपदेश प्रक्रिया होऊनही नियुक्ती देण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ५० वर शिक्षकांचा समावेश होता. नियुक्तीच्या काही तासांतच शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे कारण पुढे करून ती नियुक्ती रद्द करून १४ मार्चपूर्वी नियुक्ती देण्याची माहिती नवनियुक्त शिक्षकांना दिली. मात्र, त्यानंतर ‘निवडणूक आचारसंहितेमुळे नियुक्ती तारीख व वेळ अलाहिदा कळविण्यात येईल’, असा मेल नवनियुक्त शिक्षकांना पाठविण्यात आला. तेव्हापासून नियुक्ती देण्याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने या सर्व नियुक्त शिक्षकांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.
परीक्षा, पडताळणी एकाच वेळेस व नियुक्तीला विलंब का?
शिक्षक भरतीसाठी आवश्यक परीक्षा सर्वांची एकाच वेळी घेण्यात आली. उमेदवारांची यादीही एकाच दिवशी लागली, कागदपत्र पडताळणी सुद्धा एकाच दिवशी झाली. माग इतर जिल्ह्यांत नियुक्ती दिली. मग आमच्या नियुक्तीला विलंब का, असा सवाल या नवनियुक्त शिक्षकांकडून होत आहे.
आंदोलनाचे शस्त्र उगारणार
सोबतच्या शिक्षकांना नियुक्ती दिल्याने ते रुजू सुद्धा झाले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागलेल्या शिक्षकांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही, असा भेद का म्हणून या जिल्ह्यात लागलेल्या नवनियुक्त शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. जि. प. शिक्षण विभागाला निवेदन देऊन ते पुढील पावले उचलणार आहेत. कोर्टात याचिका टाकण्याचा इशारासुद्धा या नवनियुक्त शिक्षकांकडून देण्यात येत आहे.