५० हजारांसाठी शेतकऱ्यांना करावे लागणार आधार प्रमाणीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 11:13 PM2022-10-14T23:13:35+5:302022-10-14T23:14:59+5:30

सन २०१७-१८, सन २०१८-१९ व सन २०१९-२० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त ५० हजारपर्यंत पात्र लाभार्थींना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे, त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे.

50 thousand farmers will have to do Aadhaar authentication | ५० हजारांसाठी शेतकऱ्यांना करावे लागणार आधार प्रमाणीकरण

५० हजारांसाठी शेतकऱ्यांना करावे लागणार आधार प्रमाणीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सन २०१७-१८, सन २०१८-१९ व सन २०१९-२० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेत जास्तीत जास्त ५० हजारपर्यंत पात्र लाभार्थींना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे, त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह पहिली यादी दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी संबंधित बँका, जिल्हा उपनिबंधक व तालुका सहायक निबंधक कार्यालयात तसेच गाव चावडी, ग्रामपंचायत, विकास संस्था या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे.
आधार प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थींची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेल्यानंतर आधार क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकली असेल तर त्याबाबत शेतकऱ्यांनी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवायची आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आदेश असल्याने ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. यासाठी तालुक्यातील आपले सरकार, सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

 

Web Title: 50 thousand farmers will have to do Aadhaar authentication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.