१५ रुपयाच्या मीटरला ५०० रुपयांचे बिल
By admin | Published: July 16, 2015 01:25 AM2015-07-16T01:25:26+5:302015-07-16T01:25:26+5:30
गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना
लाभार्थी त्रस्त : गरिबांच्या घरी अंधारातच अंधार
पिंपळगाव : गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना हजारो लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. या योजनेत मिळालेल्या १५ रुपयाच्या मिटरला ५०० रुपयाचे बिल महिन्याकाठी येत असल्याने आता पोटाची खडगी भरावी की, वीज बिलाचा भरणा करावा, असा गंभीर प्रश्न अनेक गरीब कुटुंबीयांना पडला आहे.
अवाजवी बिल येत असल्याने लाभार्थ्यांना बील भरणे कठीण जात आहे. त्यामुळे महावितरण वीज कापणार असल्याने गरिबांना पुन्हा अंधारात जीवन काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही योजना गरिबांना ‘चार आण्याची कोंबडी अन् बारआण्याचा मसाला’ अशीच ठरली आहे.
गोरगरिबांच्या अंधार पसरलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी मोठा गाजावाजा करुन शासनाने राजीव गांधी विद्युतीकरण योजना सुरु केली. १५ रुपयात गरीबाच्या खोलीत विजेचा लख प्रकाश पसरावा म्हणून ही योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यातील हजारो गरिबांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या घरात विजेचा लख प्रकाश पडला. परंतु यातील किती लाभार्थी खरे व किती खोटे हा संशोधनाचा विषय ठरला. मात्रा अवाजवी बिलामुळे ही योजना आता डोकेदुखी ठरली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १५ रुपयात मीटर विजेची जोडणी व चार व्हॅटचा एक सीएफएल दिवा देण्यात आला होता. शिवाय एक ते तीन युनिट पर्यंत बिलात सवलत देण्यात आली होती. परंतु ३० युनिटच्या वर वापर केल्यास लाभार्थ्यांना सर्वसामान्य ग्राहकासारखा बिल लावण्यात येईल असे निकष ठेवण्यात आले. वास्तविक पाहता आज विज्ञान युगात कितीही गरीब असला तरी त्याच्या घरात टीव्ही व फॅन या सारख्या चैनीच्या वस्तू असतात. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे युनिट ३० च्या वर जात आहेत. त्यामुळे काही लाभार्थ्यांना तर ५०० रुपयावर बिल येत आहे. हे वाढीव बिल पाहूण गरीब लाभार्थ्यांच्या मनात धडकी भरत असून कितीही तक्रारी करुन काहीच त्यांच्यावर मार्ग निघत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. कर्मचारी मात्र निकष दाखवून त्यांची बोळवण करीत आहेत. या बिलामुळे पोटाची खडगी भरावी की वीज बिल भरावे असा गंभीर प्रश्न गरीब लाभार्थ्यांसमोर टाकला आहे. वीज बिलाचा भरणा न केल्यास कनेक्शन कापल्या जाईल या भीतीने अनेक लाभार्थी नाईलाजास्तव पोटाचा चिमटा घेऊन वीज कंपनीची तिजोरी भरीत आहे. गोरगरिबांच्या हितासाठी योजनेचे निकष शिथिल करुन वापराच्या युनिटमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
सामान्य ग्राहकांनाही फटका
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य ग्राहकांनाही फटका सहन करावा लागत आहे. अनेक ग्राहकांचा वापर नसतानाही अवाजवी वीज बिल पाठविले जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे वीज वितरणच्या कारभाराप्रति तिव्र असंतोष पसरला असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.