विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० जागा रिक्त
By Admin | Published: June 18, 2016 12:40 AM2016-06-18T00:40:50+5:302016-06-18T00:40:50+5:30
जिल्ह्यात विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० च्या वर जागा रिक्त आहेत, त्यामुळे दर्जेदार अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत.
पुरोगामी शिक्षक समितीची मागणी : प्रशासनाने लक्ष द्यावे
चंद्रपूर : जिल्ह्यात विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० च्या वर जागा रिक्त आहेत, त्यामुळे दर्जेदार अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन या रिक्त जागा त्वरीत भरण्याची मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेने मागील वर्षभरात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व मिशन नवचेतना हे गुणवत्ता वाढीचे अभियान राबविले. सर्वत्र याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र ज्या शाळांमध्ये शिक्षकांची वर्षभरही कमतरता होती, तिथे मात्र शाळांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. येत्या सत्रात सदर अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रत्येक शाळेत पुरेशी शिक्षक संख्या असणे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे मागील तीन वर्षांपासून समायोजन प्रलंबित आहे. अनेक शाळांत अतिरिक्त शिक्षक कार्यरत आहेत तर काही शाळा मागील वर्षभर आवश्यक शिक्षकांविना होत्या. तसेच जिल्ह्यात केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची अनेक पदे वर्षभरापासून रिक्त आहेत.
पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे विस्तार अधिकाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
केंद्रप्रमुखांच्या पदोन्नत्या अन्य जिल्ह्याप्रमाणे अभावितपणे करता येतात. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी हे शाळांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून शिक्षकांना मार्गदर्शन करणे, नवनवीन अध्यापन कौशल्य सांगणे, याचप्रमााणे ते प्रशासन शिक्षकामधील महत्त्वाचा दुवा म्हणूनही कार्य करीत असतात. त्यांच्या अभावी शाळांकडे दुर्लक्ष होत आहे.
मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत कोणीच येत नसल्यामुळे अनेक शाळा नवनवीन उपक्रम राबविण्यात मागे पडत आहे. त्यामुळे पदोन्नत्या नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी केल्यास शाळा व प्रशासनामध्ये असलेला असमतोल दूर होवू शकतो, असे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंबधीही चर्चा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी विजय भोगेकर, दीपक वऱ्हेकर, हरीश ससनकर, अशोक वैद्य, निखील तांबोळी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)