तीन वर्षांत ५१ कोटींची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:33 PM2018-04-01T23:33:38+5:302018-04-01T23:33:38+5:30
१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. या दारूची किमंत ५१ कोटी ८२ लाख २७ हजार ८७६ एवढी आहे. दारू, वाहने आणि इतर साहित्य मिळून तीन वर्षात पोलिसांनी १२१ कोटी १७ लाख ८३ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अनेकांना अटक झाली असली तरू खून, मारहाण, दंगा, चोरी अशा गुन्हेगारीत कमालीची घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१७ या पहिल्या दोन वर्षात दारूसाठा जप्तीचे प्रमाण कमी होते. पहिल्या वर्षी एक लाख ५० हजार ९४५ लिटर तर दुसऱ्या वर्षी एक लाख ८३ हजार ४६६ लिटर दारू जप्त करण्यात आली होती. तिसºया वर्षी तीन लाख २८ हजार ३१८ लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. या तीन वर्षात २२ हजार ३३६ प्रकरणात २५ हजार १३५ आरोपींना पोलिसांनी अटक केली. तीन हजार ६२३ दुचाकी व १ हजार १५७ चारचाकी वाहने जप्त केली. नऊ कोटी १२ लाख १४ हजार ८९ रुपयाचे इतर साहित्यही जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई होत असली जिल्ह्यात दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे आर्थिक संबंध सुद्धा या काळात उघड झाले. तर काही दिवसांपुर्वीच पोलिसांच्या गाडीचा चंद्रपुरात दारू आणण्यासाठी उपयोग करण्यात आला होता, हे सुद्धा उघड झाले. दारूविक्रेत्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या. दरम्यान मद्याला पर्याय म्हणून अमली पदार्थ सुद्धा चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात सेवन केले जात आहे. गांजा, चरस आणि गर्दच्या विळख्यात विद्यार्थी सापडले आहेत.
अमली पदार्थाचा वापर
दारूबंदीनंतर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. मागील ३२ महिन्यात तब्बल ३१३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. १८ प्रकरणात २८ आरोपींना अटक करण्यात आली. ब्राऊन शुगरसारखे अंमली पदार्थसुद्धा चंद्रपूर शहरात पोलिसांनी पकडले असून आतापर्यंत ८८ मिलीग्रॅम गर्द जप्त केले. गुंगीचे औषध असलेली डोडा भुकटीसुद्धा पोलिसांनी पकडली.
वहानगावने उडविली होती प्रशासनाची झोप
अवैध दारूविक्रीला कंटाळून चिमूर तालुक्यातील वहानगाव वासीयांनी आम्हाला दारूविक्रीची परवनागी द्यावी, अन्यथा ग्रामपंचायतमध्ये खुलेआम दारूविक्री करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामसभा घेवून ग्रामपंचायतीने दारूविक्रीचे खुलेआम दुकान लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उपसरपंच प्रशांत कोल्हे याला हद्दपार करण्यात आले. तेव्हा प्रशासनाविरूद्ध गावकरी उभे ठाकले होते.