५३ टक्के रुग्ण ४० वर्षांखालील, तरीही लसीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:27+5:302021-04-21T04:28:27+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची ...
चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मृतांच्या आकडेवारीमध्येही ४० वर्षांखालील नागरिकांचा समावेश दिसून येत आहे. परंतु, तरीही शासनाकडून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ६१७, ६ ते १८ वयोगटातील ३७६४, १९ ते ४० वयोगटातील १९ हजार ६१, ४१ ते ६० वयोगटातील १५ हजार १०४, ६१ वर्षांवरील ४ हजार ८९८ रुग्णांची नोंद करण्यात आली. या आकडेवारीचा विचार केल्यास ० ते ४० वयोगटातील सुमारे २३ हजार ४४२ नागरिक बाधित झाले आहेत. ही आकडेवारी ४५ वर्षांवरील रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे. बहुतांश ज्येष्ठांचे घराबाहेर पडणे बंद आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तू असो किंवा इतर कामासाठी युवकच बाहेर पडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठांपेक्षा युवकच अधिक बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा ४५ वर्षांखालील नागरिकांसाठीच लस उपलब्ध नसल्याने त्यांनी पुन्हा किती प्रतीक्षा करावी लागणार हे वेळच सांगणार आहे.
-----
कोट
लस घेतल्यानंतर दीड महिन्यात इम्युनिटी तयार होत असते. लस घेतल्यानंतरही जवळपास ३० टक्के इन्फेशन होण्याची भीती असते. त्यामुळे लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. बहुतांश युवक गाफील असतात. मात्र, आपल्यामुळे कुटुंबाला बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.
-डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर
बॉक्स
लस मिळेपर्यंत अशी घ्या काळजी
कोरोनामुळे ४० वर्षांखालील युवकांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे युवकांनी गाफील राहू नये. विनाकारण घराबाहेर पळणे टाळणे. आवश्यक काम असेलच तरच मास्क घालून बाहेर पडावे. घोळका करून गप्पा करणे टाळावे, दररोज सायंकाळी गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.
अनेकजण शहरातील परिस्थिती पाहण्याच्या उद्देशाने सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडतात. मात्र, यामुळेही अनेकांना बाधा होत आहे. तर काहीजण केवळ खर्रा खाण्याच्या उद्देशाने बाहेर जातात. परंतु, एका खर्रामुळे राजुरा तालुक्यात चारजण बाधित झाल्याचा प्रकारही घटला आहे.
बॉक्स
४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण रखडले
शासनातर्फे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याभरात ४५ केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. विविध व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, दुसरा बुस्टर डोस घ्यायचा आहे. तर बहुतेक ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला व दुसराही डोस बाकी आहे. परंतु, जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्रावर लसच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश केंद्र बंद अवस्थेत आहेत.