चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास 542 कोटींची प्रशासकीय मान्यता

By राजेश भोजेकर | Published: January 10, 2024 08:07 PM2024-01-10T20:07:19+5:302024-01-10T20:08:36+5:30

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित

542 crore administrative approval for sewage disposal project of Chandrapur Municipal Corporation | चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास 542 कोटींची प्रशासकीय मान्यता

चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास 542 कोटींची प्रशासकीय मान्यता

चंद्रपूर : केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या रु. 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे.

केंद्र शासन पुरस्कृत 2.0 अभियानाची शासन निर्णयान्वये सन 2021-22 पासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा सरोवरांचे पुनर्जीवन व हरित क्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. आणि यापूर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्याच्या 18236.39 कोटी प्रकल्प किमतीच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. 

चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पांतर्गत कार्य सर्वेक्षण, मलनि:स्सारण प्रणाली, गृह सेवा कनेक्शन, रस्ता पुनर्रसंचयित करणे, रेल्वे क्रॉसिंग पुढे ढकलणे, राष्ट्रीय महामार्ग 9 आणि नाला क्रॉसिंग एकूण 7, पंपिंग मशिनरी, सीवरेज पंपिंग स्टेशन, सीवर स्वच्छता तपासणी आणि नूतनीकरण आदी कामे असणार आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी विहितकालावधीत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा, प्रकल्पव्यवस्थापन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन विकास व व्यवस्थापन सल्लागार यांची संयुक्तरीत्या राहील. अमृत 2.0 अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार सदर प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करावी. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाच्या केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास लागू राहतील.

शहरात 233 किलोमिटरची पाईप लाईन

पहिल्या टप्प्यात चंद्रपूर शहरात 233 किलोमिटर पाईप लाईन मलनिःसारण करण्यासाठी होणार असून यातून शहरातील 54 हजार घरांना जोडणी होणार आहे.

Web Title: 542 crore administrative approval for sewage disposal project of Chandrapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.