खरिपाची ५५ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:32 PM2018-07-03T22:32:13+5:302018-07-03T22:32:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंधरा ते वीस दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. परिणामी आजपर्यंत केवळ ५५ टक्के म्हणजे जवळपास १ लाख ७६ हजार ४३२ हेक्टरवर पेरणी झाली असून ३५ टक्के पेरणीची कामे अद्यापही व्हायची आहेत. काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिमझीम असल्याने सध्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. लवकरच पेरणीची कामे आटोपतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यावर्षी जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार ३१८ हेक्टरवर खरिप पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने आनंदीत शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. मात्र त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे काही शेतकºयांनी पेरणीची कामे थांबविली.
पावसाने बरिच विश्रांती घेतल्याने जागा कडक आली आणि पेरणी शक्य नव्हती. अशात अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पेरणीच्या कामांना वेग आला असून लवकरच निर्धारीत क्षेत्रावर पेरणी पूर्ण होईल, असा आशावाद कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी धान, कापसू, सोयाबीन आदी पिकांची लागवड झाली आहे.
जिल्ह्यात पिकनिहाय झालेली पेरणी
आतापर्यंत जिल्ह्यात ९८ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी झाली आहे. तर ३२ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, २४ हजार १०२ हेक्टरवर तूर व २१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी ५५.२० एवढी आहे.