५५२ शेतकऱ्यांना नोकरी आणि प्रकल्पग्रस्तांना १३५ कोटींचा मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:21 PM2018-12-31T21:21:36+5:302018-12-31T21:21:54+5:30
आमच्या हजारो पिढ्यांनी आधी शेतीच केली आहे. त्यामुळे शेती कशी करायची हे आमच्या रक्तात आहे. शेती आपली आई आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांनी त्याचा मोबदला घेताना पैसा हातचा न गमावता काही पैशातून पुन्हा शेती खरेदी करा, केंद्र सरकारने मोबदल्याचे धोरण बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आमच्या हजारो पिढ्यांनी आधी शेतीच केली आहे. त्यामुळे शेती कशी करायची हे आमच्या रक्तात आहे. शेती आपली आई आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांनी त्याचा मोबदला घेताना पैसा हातचा न गमावता काही पैशातून पुन्हा शेती खरेदी करा, केंद्र सरकारने मोबदल्याचे धोरण बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्याचा शेतकºयांनी योग्य उपयोग करावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
वणी क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मुंगोली, निरगुडा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आज १३५ कोटी रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच ५५२ शेतकºयांना वेकोलिच्या प्रकल्पात नोकरी देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते हे धनादेश वाटप वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेडने आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात पार पडले. यावेळी ना. अहीर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक आर.आर. मिश्रा, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदरकुरवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, सभापती ब्रिजभुषण पाझारे, खुशाल बोंडे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, वेकालि वणी क्षेत्राचे क्षेत्रिय महाप्रबंधक मिश्रा, वेकालि वणी क्षेत्राचे नवीन क्षेत्रिय महाप्रबंधक कावळे, जि.प. सदस्य नितू चौधरी, राहुल सराफ, बेलसनीच्या सरपंच मनिषा वाढई, निलजईचे सरपंच मनोज डंभारे, बेलोराचे सरपंच प्रकाश खुटेमाटे आदी उपस्थित होते.
यावेळी ना. अहीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव असून त्यांच्या काळातच मोबदला देण्याचे ब्रिटीशकालीन कायदे बदल करण्यात आले आहेत. गरीब घरात जन्मलेल्या प्रधानमंत्र्यांना गरिबीची जाणीव असून त्यामुळेच येत्या काळामध्ये शेतीला चांगले दिवस येतील, अशी आशा आपण बाळगायला हवी. पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण अवलंबिले आहेत. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या शेती प्रकल्पामध्ये जात आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला मिळतो आहे. मात्र या मोबदल्यात काही रक्कम पुन्हा वेगळ्या ठिकाणी शेती घेण्यासाठी खर्च करावी, अशी आपली प्रामाणिक सूचना आहे. कारण शेती ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जगण्यास व आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यास कामी पडते.
कधीकाळी कोळसा खाणी व संबंधित कंपन्या या घोटाळ्यासाठी प्रसिद्ध झाल्या होत्या. आपणसुद्धा या कोळशाच्या विक्री प्रकरणांमध्ये लक्ष घातले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणीच्या पैसा सार्वजनिक हितामध्ये आता वापरात येऊ शकला आहे, असे ना. अहीर म्हणाले.