५५६ जातवैधता प्रमाणपत्र रखडले
By Admin | Published: November 12, 2016 12:51 AM2016-11-12T00:51:34+5:302016-11-12T00:51:34+5:30
जातवैधता प्रमाणपत्राचा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी दस्तावेज सादर केल्यानंतर ...
एसएमएस सेवा : २४४ उमेदवारांचे प्रमाणपत्र उपलब्ध
चंद्रपूर : जातवैधता प्रमाणपत्राचा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी दस्तावेज सादर केल्यानंतर तातडीने ते निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही प्रशासकीय अडचणींमुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील ५५६ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र नागपूर येथील कार्यालयाकडे प्रलंबित आहेत.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासाठी चंद्रपूर येथे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव दिलीप चव्हाण यांनी उमेदवारांनी दस्तावेज सादर केल्यावर त्यांचा वेळ व पैसा विनाकारण खर्च होऊ नये, याकरिता एसएमएस सेवा सुरु केली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २४४ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र नागपूर येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एम. एस. सूर्यवंशी यांनी गुरूवारी पाठविले. त्यांच्या वितरणाबाबत चव्हाण यांनी एसएमएस उमेदवारांना माहिती दिली आहे.
या २४४ जात वैधता प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थी, निवडणुकीतील उमेदवार आणि कर्मचारी आदींचा समावेश आहे. त्या सर्वांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित आणखी ५५६ उमेदवारांचे जात प्रमाणपत्र पडताळणी तयार असून ते समितीच्या अध्यक्षांकडे स्वाक्षरीकरिता पाठविण्यात आलेले आहे. अध्यक्षांची स्वाक्षरी होऊन नागपूर येथे प्राप्त झाल्यानंतर त्या प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय गाजला होता. चंद्रपूर येथील तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५० वर्षांचा महसूल दाखला अनिवार्य केला होता. ज्या उमेदवारांकडे ५० वर्षांपूर्वीचा महसूल दाखला उपलब्ध नव्हता, त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे या विषयात अनेक संघटनांनी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर यापूर्वी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्राकाचीच माहिती उपलब्ध करण्यात आली. त्यानंतर हा विषय थंड झाला.
जात प्रमाणपत्राप्रमाणेच जात वैधता पडताळणीचा विषयदेखील संवेदनशील आहे. त्यावर संबंधित उमेदवाराचे भवितव्य ठरत असते. (प्रतिनिधी)
नागपूरच्या अध्यक्षांकडे प्रभार
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एम. एस. सूर्यवंशी यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. चंद्रपूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी एस. एम. भागवत यांनी ५ जुलै २०१६ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु भागवत चंद्रपूरच्या पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा प्रभार स्वीकारला नाही. त्यांनी प्रतिनियुक्तीवर इतरत्र नियुक्ती मिळविली. भागवत प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे चंद्रपूरच्या समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे नागपूर येथील विभागीय समितीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांच्याकडे चंद्रपूरचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे आणखी चार जिल्ह्यांचा पदभार असल्याने ते सध्या सहा जिल्ह्यांचा कारभार सांभाळत आहेत. याशिवाय ते महसूल विभागाचीही कामे करीत आहेत. त्यामुळे ते जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.