पेन्शन परतीच्या नोटिशीला ५७१९ करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:28+5:302021-06-01T04:21:28+5:30

चंद्रपूर : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ नोकरदार व करदातेही घेत ...

5719 taxpayer farmers protest against pension refund notice | पेन्शन परतीच्या नोटिशीला ५७१९ करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा

पेन्शन परतीच्या नोटिशीला ५७१९ करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा

Next

चंद्रपूर : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ नोकरदार व करदातेही घेत असल्याने लाभ घेतलेली रक्कम परत करण्याबाबत जिल्ह्यातील ८,४४४ जणांना नोटीस पाठविण्यात आली. मात्र, केवळ २७२५ लाभार्थ्यांनी या नोटीसीला गांभीर्याने घेत पैसे परत केले आहे, तर ५७१९ लाभार्थ्यांनी या नोटीसीला ठेंगा दाखवला आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या वतीने किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. ज्या शेतकऱ्यांचे लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र दोन हेक्टर आहे. अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. आजपर्यंत जिल्ह्यातील २,८०,१४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, अनेक नोकरदार, करदात्यांनीसुद्धा आपले आर्थिक उत्पन्न चांगले असतानासुद्धा या योजनेचा लाभ घेतला. ही बाब लक्षात येताच नोकरदार व करदात्यांना नोटीस पाठवून रक्कम परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील ८,४४४ शेतकऱ्यांना रक्कम परत करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, केवळ २,७२५ जणांनी २,४२,७०,००० रुपये जमा केले, तर अद्याप जिल्ह्यातील ५,७१९ जणांनी नोटीसकडे कानाडोळा केला आहे. त्यांच्याकडून सुमारे ४,३२,१८,००० रुपये येणे थकीत आहे.

बॉक्स

आतापर्यंत

दोन कोटी ४२ लाख वसूल

चंद्रपूर जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत २,८०,१४८ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी ८४४४ जणांना अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांना रक्कम परतीसाठी नोटीस पाठविण्यात आली. त्यापैकी २,७२५ जणांनी २,४२,७०,००० रुपये परत केले, तर उर्वरित ५,७१९ जणांनी नोटीसीला ठेंगा दाखविला आहे. त्यांच्याकडून सुमारे ४,३२,१८,००० रुपये येणे थकीत आहे.

बॉक्स

१० हजार ६९४ शेतकऱ्यांना लाभाची प्रतीक्षा

पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील २,८०,१४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २,६९,४४९ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. १०,६९४ शेतकऱ्यांना अद्याप लाभाची प्रतीक्षा आहे. त्यासाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू आहे. लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

पीएम किसान योजनेचे लाभार्थी - २,८०,१४८

पैसे भरा म्हणून नोटीस पाठवलेले शेतकरी- ८,४४४

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी-२,७२५

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी-५,७१९

Web Title: 5719 taxpayer farmers protest against pension refund notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.