ब्रह्मपुरी शहराच्या विकासासाठी ५७.८ कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 02:05 PM2024-10-15T14:05:50+5:302024-10-15T14:07:16+5:30
कायापालट होणार : विजय वडेट्टीवार यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ५७.८ कोटींचा विकास निधी मंजूर करून शहराच्या विकासात नवी भर पाडली आहे.
केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष योजनेंतर्गत राज्यांतर्गत नगरपरिषद, नगरपंचायतींना निधी दिला जातो. याच योजनेंतर्गत सन २०२४-२५ या कालावधीसाठी केंद्राकडून ब्रह्मपुरी शहरातील लेंडारी तलाव, कोट तलाव, जुना आठवडी बाजार, गुजरी व इतर परिसर विकासाकरिता विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनस्तरावर सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, ब्रह्मपुरी शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या लेंडारी तलाव, कोट तलाव, जुना आठवडी बाजार, गुजरी व इतर परिसराच्या विकासाकरिता एकूण ५७.८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. शहरातील परिसर पूर्णतः विकसित होणार आहे. सदर परिसर पूर्णतः विकसित झाल्यास येथील नागरिक व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्यानंतर विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आजवर कोट्यवधींची विकासकामे मंजूर करून त्यांनी ब्रम्हपुरी शहराच्या विकासात भर घातली आहे. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भाग व शहरी भागातील सावली तसेच सिंदेवाही तालुक्यातही मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून संपूर्ण क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. निधी मंजूर करून आणल्याबद्दल ना. विजय वडेट्टीवार यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.