Agniveer Bharti 2022 : 'अग्निवीर’साठी विदर्भात ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी
By साईनाथ कुचनकार | Published: September 6, 2022 06:37 PM2022-09-06T18:37:25+5:302022-09-06T18:39:27+5:30
भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिथे रोजगाराची संधी मिळेल तिथे अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘अग्निवीर’ अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून तब्बल ५९ हजार ९११ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील उमेदवारांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड करण्यात येणार आहे. ‘अग्निवीर’साठी नोंदणी झालेल्या उमेदवारांची शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुलामध्ये प्रकिया पार पाडली जाणार आहे.