रस्त्याच्या चौपदरीकरणात ६ हजार रोपटे नष्ट होणार
By admin | Published: May 4, 2017 12:38 AM2017-05-04T00:38:42+5:302017-05-04T00:38:42+5:30
उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
चिमूर-वणी मार्ग : दोन वर्षांपूर्वी लावण्यात आली होती रोपटे
वरोरा : उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये वरोरा-चिमूर मार्गालगत दोन वर्षापासून लावण्यात आलेले सहा हजार रोपटे नष्ट होणार आहेत. रस्ता वाढविण्याकरिता आजतागत झालेला हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार असल्याने वन्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
सामाजिक वनीकरण विभाग वरोराच्या वतीने आनंदवन नजीक वरोरा-चिमूर मार्गावरील दीड किमी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा सन २०१५ मध्ये ४ हजार ५०० तर सन २०१६ मध्ये दीड हजार असे सहा हजार रोपटे लावण्यात आले. ही रोपटे उन्हाळ्यातही जीवंत असून त्याला पाणी देणे व देखभाल करण्यकरिता मजूर लावण्यात आले असल्याने अल्पावधीत रोपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उमरेड व्हाया चिमूर वरोरा-वणी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. या चौपदरीकरणाच्या कामात रोपे पूर्णत: नष्ट होणार आहे. केवळ दीड किमी अंतरावर सहा हजार रोपटे नष्ट होणार असल्याने लाखो रूपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
सामाजिक वनीकरण विभाग हतबल
वरोरा-चिमूर मार्गालगत दुतर्फा रोपे लावण्याकरिता सामाजिक वनीकरण विभागाने संबंधीत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले. नाहरकत प्रमाणपत्रात तेव्हा रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात येईल, त्यात लावलेले रोपे नष्ट झाल्यास कुठलीही तक्रार करता येणार नाही, असे नमूद करण्यात आल्याने सामाजिक वनीकरण विभाग हतबल झाले आहे.
चिमूर वरोरा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दीड किमी अंतरावरील सहा हजार रोपे नष्ट होणार असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला.
- आर.एस. वाकुरे
सामाजिक वनीकरण
अधिकारी वरोरा