सामदा घाटाजवळील डोंगरीत ६० ब्रास अवैध रेतीसाठा
By परिमल डोहणे | Updated: June 8, 2024 13:54 IST2024-06-08T13:52:57+5:302024-06-08T13:54:17+5:30
सावली तहसीलदारांनी केला रेतीसाठा जप्त : अवैध रेतीसाठ्यावर महसूल विभागाची नजर

60 brass illegal sand deposits in the hills near Samada Ghat
चंद्रपूर : मतमोजणीच्या कामात महसूल विभागाचे अधिकारी गुंतले असताना रेती तस्करांनी सावली तालुक्यातील सामदा घाटाजवळील डोंगरीपरिसरात अवैधरित्या रेतीची साठवणूक केली होती. याबाबतची माहिती तहसीलदार प्रांजली चिरडे यांना मिळताच शुक्रवारी त्यांनी धडक कारवाई करत ६० ब्रास रेतीसाठा जप्त केला. या कारवाईने रेतीतस्काचे धाबे दणाणले आहेत.
सावली तालुक्यातील रेती सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे या रेतीची मागणी अधिक असते. परंतु, रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने अनेक रेतीतस्कर सक्रीय झाले आहे. दरम्यानच्या काळात तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी रेतीतस्कारवर कारवाई केल्याने रेती तस्करीवर काही प्रमाणात अंकूश लागले होते. दरम्यान निवडणुकीच्या कामात महसूल विभाग गुंतला असल्याचे लक्षात घेऊन रेतीतस्करांनी पुन्हा डोके वर काढले होते. सामदा रेतीघाटाजवळील डोंगरीपरिसरात अवैधरित्या रेतीसाठ असल्याची माहिती मिळताच तहसीलदार चिरडे यांनी आपल्या पथकासह संपूर्ण रेतीसाठा जप्त केला आहे. या कारवाईने अवैधरित्या रेतीसाठा करुन ठेवणाऱ्या तस्कराचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई तहसीलदार प्रांजली चिरडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी निखाते, कुळमेथे, तलाठी कुडावले, मंगाम, निशानकर, वाघमारे यांनी केली.
कोट
सामदा घाटाजवळील डोंगरीपरिसरात असलेला सर्व रेतीसाठा जप्त केला आहे. तसेच सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना अवैधरित्या साठवणूक केलेल्या रेतीसाठ्याचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. जप्त केलेला रेतीसाठी घरकुल लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.
-प्राजंली चिरडे, तहसीलदार, सावली